कोल्हापूर : पाण्याचे नियोजन झाले असते, तर केरळवर पुराची वेळ आलीच नसती. देशभ्रमंती करताना याचवेळी तिथे पावसाने थैमान घातले; पण आतापर्यंतच्या माझ्या अनुभवाच्या जोरावर मी तिथून सहीसलामत बाहेर पडलो. नाहीतर जीवावर बेतले असते, असे निवृत्त ज्येष्ठ पत्रकार शरत शर्मा यांनी येथे सांगितले. पत्रकारांनी धकाधकीतूनही व्यायाम करून शरीर तंदुरुस्तीकडे लक्ष द्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला.रस्ते वाहतूक सुरक्षा आणि शारीरिक तंदुरुस्तीच्या जनजागृतीसाठी नवी दिल्लीचे ६० वर्षीय निवृत्त पत्रकार शरत शर्मा यांनी २३ राज्यांतून हजारो किलोमीटरचा प्रवास आपल्या दुचाकीवरून करत रविवारी ते कोल्हापुरात पोहोचले. यावेळी त्यांनी कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे आयोजित वार्तालापमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. प्रमुख उपस्थिती अध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष समीर मुजावर, आदींची होती.शर्मा यांनी आजवरच्या प्रवासातील कटू-गोड अनुभव सांगितले. सामाजिक बांधीलकीतून या जनजागृती मोहिमेला सुरुवात केली. याला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारतामध्ये अजूनही तंत्रज्ञानाची कमतरता आहे. चीन, जपान, अमेरिका यांसारख्या विकसित देशांच्या रांगेत भारताला यायचे असेल, तर तंत्रज्ञान ही महत्त्वाची गोष्ट आहे.पत्रकारिता करताना पत्रकारांना नेहमीच अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. संपूर्ण आयुष्य धावपळीचे असते; पण निवृत्तीनंतर आपली आयुष्याची पुंजी दवाखान्यात घालवण्यापेक्षा आत्तापासूनच व्यायामाचे महत्त्व जाणून घ्या, असा सल्लाही शर्मा यांनी दिला.विजय पाटील यांनी स्वागत व आभार मानले. यावेळी प्रेस क्लबचे पदाधिकारी, संचालक व माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.