समीर देशपांडेकोल्हापूर : होत्याचे नव्हते झाल्यासारखी स्थिती निर्माण झाल्याने कोल्हापूरमध्ये वास्तव्यास असणारे केरळवासीय अतिशय अस्वस्थ बनले आहेत. धड इकडचे व्यवसाय बंदही करता येत नाहीत आणि तेथे जाऊनही फार उपयोग नाही, अशा परिस्थितीमध्ये रोज घरच्या मंडळींची खुशाली विचारणे एवढेच या मंडळींच्या हातात आहे. तरीही कोल्हापूर मल्याळी फौंडेशनच्या वतीने केरळवासीयांच्या मदतीसाठी निधी संकलनास सुरुवात करण्यात आली आहे.कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात केरळमधील सुमारे साडेतीनशेहून अधिक कुटुंबे आहेत. बेकरी, टायर विक्री आणि पंक्चर काढण्याच्या व्यवसायामध्ये प्रामुख्याने ही मंडळी कार्यरत आहेत. येथील मुक्त सैनिक वसाहतीनजीक या सर्वांनी आयप्पा मंदिर उभारले असून, तेथे ही मंडळी एकत्र येत असतात.पोलीस दलामध्ये सेवा करून निवृत्त झालेले मोहन नायर म्हणाले, आलट्टी जिल्ह्यामध्ये संपूर्ण पुराचे पाणी आहे. माझी बहीण आणि अन्य नातेवाइकांना निवारा शिबिरामध्ये दाखल करण्यात आले आहे. मी सेवानिवृत्त आहे. मी तेथे जाऊन फार काही करू शकत नाही. त्यामुळे वस्तू आणि निधीचे संकलन सुरू आहे. ते आम्ही चार दिवसांत तिकडे पाठविणार आहोत.बेकरी व्यावसायिक मनिकुट्टम म्हणाले, कौटेम जिल्ह्यामध्येही दुर्दशा झाली आहे. तेथे माझी आई, वडील, भाऊ राहतात; परंतु तेथील स्थिती बघून खूप वाईट वाटते. आम्ही तेथे जाऊन काही करू शकणार नाही, याची आम्हांला जाणीव आहे. म्हणून ती स्थितीही पाहवत नाही आणि प्रत्यक्ष जाऊन काही करताही येत नाही, अशी स्थिती आहे. म्हणूनच शक्य ती मदत येथूनच करणार आहोत.
विचित्र स्थितीचा अनुभवकेरळवासीयांशी बोलताना या आठवडाभरामध्ये विचित्र स्थितीचा सामना त्यांना करावा लागल्याचे जाणवले. टीव्हीवरून, वृत्तपत्रांतून तेथील संकटा
ची भीषणता कळत होती. व्हॉट्स अॅपवरून जे फोटो येत होते, ते पाहून अस्वस्थता येत होती. वाहतूक यंत्रणाही ठप्प असल्याने जाताही येणे शक्य नव्हते. आमच्याच घरचे जिथे शिबिरांमध्ये राहतात, जिथे सरकारच्या मदतकार्यावरही मर्यादा आल्या, तेथे आम्ही जाऊन काय करणार? यामुळेच केवळ परिस्थिती आणखी बिघडू नये एवढीच अपेक्षा आम्ही व्यक्त करीत होतो. आता जरा पुराचे पाणी कमी होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र झालेले नुकसान पाहवत नाही, अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या.
‘व्हाईट आर्मी’चे मदतकार्य सुरूयेथील ‘व्हाईट आर्मी’ने गेल्या चार दिवसांपासून केरळमध्ये मदतकार्याला सुरुवात केली आहे. नऊ डॉक्टरांसह सुमारे २५ जणांचे पथक केरळला गेले असून तेथे प्रथमोपचारासह सर्व कामे या पथकाने सुरू केली आहेत. नागरिकांना स्थलांतरित करण्यापासून ते रांगा लावण्यापर्यंत सर्व कामे या पथकाकडून केली जात आहेत.