कोल्हापूर : कोल्हापूरचा ऐतिहासिक सांस्कृतिक ठेवा असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली अधिकारी तसेच तज्ज्ञांची समिती नियुक्त केली असून, या समितीला लवकरच अहवाल देण्यास सांगण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील या चौकशी समितीत शहर अभियंता, विद्युत विभागाचे अधीक्षक, मुख्य अग्निशमन अधिकारी यांच्यासह दोन तज्ज्ञांचा समावेश असेल. सर्व शक्यता गृहीत धरून चौकशी करावी आणि आगीचे नेमके कारण काय आहे हे शोधावे तसेच त्याचा अहवाल देण्याची जबाबदारी या समितीवर सोपविण्यात आली आहे, असे मंजुलक्ष्मी यांनी सांगितले.आग लागल्यानंतर केवळ दहा मिनिटात महापालिकेची सर्व यंत्रणा घटनास्थळी पोहोचली. जिल्हाधिकारी तसेच माझ्यासह महापालिकेचे सर्व अधिकारी तात्काळ तेथे पोहोचले. आग आटोक्यात आणण्यासाठी ज्या उपाययोजना करायच्या होत्या, त्याचे घटनास्थळावरूनच नियोजन केले. तास दीड तासाच्या कालावधीत आग नियंत्रणात आली. पण दुर्दैवाने नाट्यगृह जळून गेले, असेही त्यांनी सांगितले.
नाट्यगृहाचा विमा, भरपाईचा दावा करणारनाट्यगृहाचे नूतनीकरण केल्यानंतर त्याच्यावर विमा उतरविण्यात आला आहे. विम्याची ही रक्कम साडेसात कोटींची आहे. त्यामुळे नुकसानभरपाई मिळण्यासाठी महापालिका विमा कंपनीकडे दावा करणार आहे. त्याची पोलिस पंचनामे, अग्निशमनचे पंचनामे करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत, असे मंजुलक्ष्मी यांनी सांगितले.
वर्षापूर्वीच फायर ऑडिटनाट्यगृहाचे फायर ऑडिट प्रत्येक वर्षी केले जाते. गेल्या वर्षीही त्याचे फायर ऑडिट करण्यात आले होते. प्राथमिक अग्निप्रतिबंधक उपकरणे त्याठिकाणी बसविण्यात आली होती, असा खुलासा त्यांनी केला.
नाट्यगृह पुनर्बांधणी अंदाजपत्रक करण्याच्या सूचनाआगीमुळे केशवराव भोसले नाट्यगृहाची प्रचंड हानी झाली आहे. त्यामुळे नाट्यगृहाची पुनर्बांधणी करावी लागणार आहे. त्यासाठी किती खर्च येऊ शकतो या संबंधीचे खर्चाचे तसेच अंतर्गत सजावटीचे आराखडे तयार करून राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. अंदाजपत्रके तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहे, अशी माहितीही मंजुलक्ष्मी यांनी दिली.