केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा उभारण्यासाठी निधी वेळेतच देणार : अजित पवार

By संदीप आडनाईक | Published: August 11, 2024 02:13 PM2024-08-11T14:13:12+5:302024-08-11T14:13:32+5:30

नाट्यगृहाची केली पाहणी : होतं तसं उभं करण्याच्या केल्या सूचना

Keshavrao Bhosle will provide funds for re-establishment of theater in time: Ajit Pawar | केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा उभारण्यासाठी निधी वेळेतच देणार : अजित पवार

केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा उभारण्यासाठी निधी वेळेतच देणार : अजित पवार

कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे आगीत नुकसान झाले. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेला निधी वेळेतच देणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी रविवारी दिली.

कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या पवारांनी रविवारी सकाळी नाट्यगृहाची पाहणी केली. यावेळी उपस्थित कलावंतांशी त्यांनी संवाद साधला. ऐतिहासिक वास्तूचे बारकावे आहे तसेच पुन्हा उभारण्यासाठी वेळ लागू शकतो, परंतु कामे चांगली होतील. लाकडी काम, दगडी काम आणि सिसम सारख्या लाकडांचा वापर होणार असल्याने बारकावे लक्षात घेवून नाट्यगृह उभारण्याच्या सूचना प्रशासनाला त्यांनी दिल्या. 

यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमकार दिवटे तसेच प्रशासनाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

पवार विमानतळावरून थेट केशवराव भोसले नाट्यगृहात आले. प्रारंभी त्यांनी भस्मसात झालेल्या मुख्य रंगमंचाची पाहणी केली. तेथे नाट्यगृहाची उंची वाढविण्याच्या सूचना केल्या. कलावंत, प्रेक्षक तसेच कोल्हापूरवासियांप्रमाणेच आमच्याही भावना या नाट्यगृहाशी जोडल्या आहेत. हे पुनर्बांधनीचे काम मोठं असून यासाठी लागणारा वेळ आर्किटेक्चरच सांगतील असेही ते म्हणाले. जाहीर निधीपेक्षा जास्त लागला तरी तो दिला जाईल, मात्र नाट्यगृह पुर्वीसारखे पुन्हा तयार करण्याच्या सूचना त्यांनी आयुक्तांना दिल्या.

आराखडा तयार करण्याच्या सूचना
पवार यांनी संरक्षक भिंतीचीही पाहणी करून खासबाग मैदानावरील नुकसान झालेल्या रंगमंचाचीही पाहणी केली. एसी नव्याने बसविताना त्याचे बाहेरील युनिट सुरक्षित ठिकाणी बसवा, खासबाग मैदान आणि नाट्यगृहासाठी आवश्यक छताचा पत्रा उत्कृष्ट वापरा, बाहेरील संरक्षक भिंतीही जुने पुरावे किंवा छायाचित्र पाहून चांगल्या पद्धतीने तयार करण्याच्या सूचना केल्या. स्वच्छतागृह, इतर भिंती आणि दगडांचे बांधकाम करताना मजबूत, एकसारखे ऐतिहासिक दिसेल अशा पद्धतीने करा. ऐतिहासिक बांधकाम करणाऱ्या आर्किटेक्चरची निवड करून त्यांच्याकडून सर्व इमारत जशी आहे तशी दिसेल असा आराखडा तयार करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या.

Web Title: Keshavrao Bhosle will provide funds for re-establishment of theater in time: Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.