कोल्हापूर : गेली चार वर्षे ज्या पदावरून राजकीय उलथापालथी झाल्या, त्याच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी शेवटचे वर्षदेखील कुरघोडीचेच राहणार असल्याचे दिसत आहे. पदाधिकाऱ्यांच्या खांदेपालटाचे संकेत नेत्यांनीच दिल्याने या कुरघोड्यांना बळ मिळाले आहे. अध्यक्षपद हाच कळीचा आणि वर्चस्वाचा मुद्दा राहणार आहे. सर्वांत जास्त संख्या म्हणून काँग्रेसने अध्यक्षपदावर दावा कायम ठेवला आहे, तर राष्ट्रवादीनेही अध्यक्षपदासाठी तयारी सुरू केली आहे. शिवसेनाही या पदासाठी बाशिंग बांधून तयारच आहे.
गेल्या वर्षी जिल्हा परिषदेत सत्ताबदल होऊन काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व घटकपक्षासह महाराष्ट्रात प्रथमच तयार झालेल्या महाविकास आघाडीने भाजपकडून सत्ता काढून घेतली. दोनच वर्षे कार्यकाल राहिल्याने आणि पदासाठी इच्छुकांची संख्या जास्त असल्याने एक वर्षात पदाधिकारी बदलाचा फॉर्म्युला ठरला होता. याची मुदत या महिन्यात संपत असल्याने इच्छुकांनी नेत्यांकडे फेऱ्या वाढविल्या होत्या. पदवीधर व शिक्षक निवडणूक निकालानंतर बघू, असे सांगितले होते. आता या निवडणुका संपल्याने आणि स्वत: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी खांदेपालटाचा हिरवा कंदील दर्शविल्याने या घडामोडी आता वेगावल्या आहेत.
चौकट ०१
पी. एन. व सतेज पाटील यांच्यात चुरस
अध्यक्षपद हे राष्ट्रवादीकडे जाईल असे वाटत असतानाच असे काही ठरले नव्हते, ज्यांचे संख्याबळ जास्त त्यांचा अध्यक्ष या नात्याने १३ सदस्यांसह काँग्रेसच प्रबळ दावेदार असल्याचे काँग्रेस म्हणत आहे. हे पद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने काँग्रेसने चाचपणी सुरू केली असून, पांडुरंग भांदिगरे हे एकमेव त्या प्रवर्गातील सदस्य आहेत. ते पी. एन. समर्थक आहेत. पी. एन. समर्थकांकडे सध्या कोणतेच पद नसल्याने ते पुन्हा आग्रह धरू शकतात.
चौकट ०२
मुश्रीफ सांगतील तेच
राष्ट्रवादीकडे युवराज पाटील, जयवंत शिंपी, विजय बोरगे हे ओबीसी चेहरे आहेत; पण अध्यक्षपद त्यांच्याकडे येणार की नाही, हे माहीत नसल्याने हे उपाध्यक्षपदावरही दावा सांगू शकतात. मुश्रीफ हेच राष्ट्रवादीचे एकमेव नेते असल्याने ते जे सांगतील तेच पदाधिकारी होतील अशी स्थिती आहे.
चौकट ०३
आबिटकर ‘बांधकाम’साठी आग्रही
आबिटकर सुरुवातीपासून महाविकास आघाडीशी एकनिष्ठ राहिले. शिवाय त्यांना पद मिळालेले नाही, त्यामुळे खांदेपालटात रोहिणी आबिटकर यांच्या रूपाने या गटाने ‘बांधकाम’वर प्रबळ दावा सांगितला आहे. रसिका पाटील या अपक्ष सदस्यांचाही दावा कायम आहे.
चौकट ०४
महिला बालकल्याण आघाडीकडेच
महिला बालकल्याण सभापतिपद हे स्वाभिमानी व आवाडे गटात वाटून घेण्याचे ठरले होते; पण आवाडेच महाविकास आघाडीतून बाहेर पडले असल्याने आता स्वाभिमानी आणि इतर घटक पक्षांत चुरस असेल. स्वाभिमानीने हे सलग पद घेतल्याने आता मंडलिक, नरके, चंदगड व शाहूवाडी विकास आघाडीतील सदस्याला हे पद मिळू शकते.
चौकट ०५
‘समाजकल्याण’मध्येही चुरस
‘समाजकल्याण’साठी नरके व पी. एन. गटाचा आग्रह कायम असेल. नरके यांच्याकडे कोमल मिसाळ, तर पी. एन .यांच्याकडे सुभाष सातपुते हे इच्छुक असतील. शिक्षण सभापतिपद शिवसेनेकडेच राहू शकते.
महाविकास आघाडीचे संख्याबळ
काँग्रेस १३
राष्ट्रवादी ११
शिवसेना १०
स्वाभिमानी ०२
शाहू विकास आघाडी ०२
चंदगड विकास आघाडी ०१
इतर ०२
एकूण ४१
सत्ताधाऱ्यांचे गटनिहाय बलाबल
हसन मुश्रीफ ११
सतेज पाटील गट ०७
पी. एन. पाटील गट ०५
आबिटकर गट ०२
मंडलिक गट ० १
सत्यजित पाटील गट ०२
संजय घाटगे गट ०१
मिणचेकर गट ०१
उल्हास पाटील गट ०१
चंद्रदीप नरके गट ०३
भुदरगड आघाडी ०१
(काँग्रेसच्या चिन्हावर विजयी झालेल्या रेश्मा देसाई यांची भूमिका संदिग्ध आहे.)