कोल्हापूर : ‘ज्या दिवशी महाराष्ट्र खड्डेमुक्त होईल, तो दिवस माझ्यासाठी सर्वाधिक आनंदाचा असेल,’ असा प्रतिटोला खासदार सुप्रिया सुळे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला. सेल्फी काढण्यासाठी आता यापुढे खड्डेच पडणार नाहीत, असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले होते. नातेवाइकांच्या विवाहसोहळ्यासाठी कोल्हापुरात आलेल्या सुळे यांच्याशी गुरुवारी सायंकाळी पत्रकारांनी संवाद साधला त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
खासदार सुळे म्हणाल्या, मराठा आरक्षण मिळावे अशी आमची इच्छा आहे. मात्र मुख्यमंत्री एक सांगत आहेत, त्यांचे मंत्री दुसरेच सांगत आहेत. त्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्याबरोबरच अस्वस्थताही निर्माण झाली आहे. म्हणूनच अजितदादांनी सर्वांना हा अहवाल पोहोचवा, असे आवाहन सरकारला केले आहे. विरोधी पक्षनेते म्हणून बारामतीला आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता आल्यास पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना आरक्षण देऊ असे जाहीर केले होते. आतापर्यंत २०८ कॅबिनेट बैठका झाल्या. कुठे आहे धनगर आरक्षण? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला.
खात्यावर १५ लाख रुपये जमा झाले नाहीत, महिला सुरक्षित नाहीत, सर्व जनतेमध्ये अस्वस्थता आहे, दुष्काळावरूनही फसवणूक सुरू आहे... या सरकारला सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची जाणीव नसल्याने हे सरकार वास्तवतेपासून पळणारे आहे, अशी टीका यावेळी सुळे यांनी केली.सेल्फी, फोटोसाठी मोठी गर्दीआजच्या या दौऱ्यामध्ये शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासमवेत फोटो आणि सेल्फी काढून घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यामध्ये युवकांचा मोठा समावेश होता. सुप्रिया सुळे यांनीही न कंटाळता कार्यकर्त्यांसमवेत फोटो काढून घेतले. पवार सत्तेत नसले तरीदेखील त्यांचा गोतावळा किती आहे, याचे दर्शन पुन्हा एकदा गुरुवारी येथील शासकीय विश्रामगृहावर पाहावयास मिळाले.पवार कुटुंबीय एकत्रआपले नेते शरद पवार यांचे कुटुंबीय एक त्रपणे कोल्हापुरात आल्याने आणि ते सर्वजण शासकीय विश्रामगृहावर असल्याने कार्यकर्ते औत्सुक्याने हे सर्व पाहत होते. शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार दुपारी एकत्र आले; तर त्यानंतर थोड्या वेळानंतर खासदार सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांच्यासह आगमन झाले. सायंकाळी पवार कुटुंबीयांनी प्रा. एन. डी. पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी प्रा. पाटील यांच्या पत्नी सरोज उपस्थित होत्या.