कोल्हापूर : भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, जनसुराज्य शक्तीचे आमदार विनय कोरे, माजी खासदार धनंजय महाडिक यांची रविवारी अचानक रेसिडेन्सी क्लबमधील बंद खोलीत सुमारे तासभर बैठक झाली. विशेष म्हणजे माजी आमदार महादेवराव महाडिक यांनीही उपस्थित लावली होती. बैठकीनंतर त्यांना विचारले असता ही अनौपचारिक बैठक असल्याचे म्हटले. तोंडावर असणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमवर झालेली ही बैठक चर्चेचा विषय ठरली आहे.
कोल्हापूर महापालिकेची निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी स्वबळावर लढणार आहे तर भाजप, ताराराणी आघाडी आणि जनसुराज्य शक्ती हे तीन पक्ष निवडणूक एकत्र लढविणार असल्याचे निश्चित मानले जात आहे, असे असतानाचा रविवारी सकाळी ११ च्या सुमारास रेसिडेन्सी क्लब येथे या तिन्ही पक्षांतील प्रमुख नेत्यांची बंद खोलीत बैठक शहरात चर्चेचा विषय ठरली आहे.
चौकट
काही दिवसांपासून आमदार महादेव महाडिक राजकारणापासून अलिप्त होते. रविवारी भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, जनसुराज्य शक्तीचे आमदार विनय कोरे आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यासोबतच्या बैठकीत त्यांनी आवर्जुन हजेरी लावल्यामुळे ते पुन्हा ॲक्टिव्ह झाल्याचे दिसून आले. पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला असता मात्र, त्यांनी याचे खंडन केले. ही योगायोगाने भेट झाली असून महापालिकेसंदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी म्हटले.
चौकट
महाडिकांना सगळे चालतात
बैठकीनंतर महादेवराव महाडिक आणि धनंजय महाडिक बाहेर आल्यानंतर एक कार्यकर्ता त्यांच्यासमोर आला. यावेळी महादेवराव महाडिक यांनी त्याला पाहिले असता तो म्हणाला, साहेब मी तुमचाच कार्यकर्ता आहे. यावर महाडिक म्हणाले, महाडिकांना सगळे चालतात. कोणाचेही वावडे नाही. पत्रकारांनी त्यांना बैठकीविषयी विचारले असता पृथ्वीराज धनंजय महाडिक यांनी घरगुती कार्यक्रमाच्या नियोजनासाठी भेटल्याचे सांगितले.
चौकट
महापालिकेसंबंधात चर्चा नाही : चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील यांना बैठकीतील माहितीविषयी विचारले असता ते म्हणाले, मी नेहमीच कोल्हापुरात आल्यानंतर विविध क्षेत्रांतील लोकांच्या भेटी घेतो. आज वेळ कमी असल्यामुळे राजकारणातील या नेत्यांना एकत्र भेटण्याचा योग आला अनौपचारिक गप्पा केल्या. महापालिकेच्या निवडणुकीला अजून अवधी असल्याने यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही.