कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात आज खंडेनवमीला कोल्हापूरच्या करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईची आदि शंकराचार्यांवर कृपा करणाऱ्या भगवती अन्नपूर्णेच्या स्वरुपात पूजा बांधण्यात आली. खंडेनवमीला आज भाविकांनी नवरात्र महोत्सवाची सांगता केली.रोजच्या धार्मिक विधीप्रमाणे सकाळी अभिषेक व दुपारची महाआरती झाल्यानंतर अश्र्विन शुद्ध नवमीला आज, अंबाबाईची आदी शंकराचार्यांनी रचलेल्या अन्नपूर्णा स्तोत्रावर आधारित भगवती अन्नपूर्णेच्या स्वरुपात पूजा बांधण्यात आली.भगवान शंकर म्हणजे वैराग्य मूर्ती. हातात रत्नखचित पात्र घेऊन जगाच्या उद्धारासाठी दारोदार भिक्षा मागणाऱ्या भगवान शंकरांनी कधीतरी आपल्या हातचं अन्न खावं ही कुठल्याही सामान्य गृहिणीप्रमाणे माता पार्वतीची अपेक्षा. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी नारदांनी तिला एक उपाय सांगितला. त्यांनी गौरीला सांगितले की काशी मध्ये कुणाचीही चूल पेटू देऊ नको, तेव्हा पार्वतीने विचारलं मग लोकांनी उपाशी रहावं का? तर नारदांनी उत्तर दिले हे मी सांगू शकत नाही, तू जगन्माता आहेस, ते तू ठरव.
केवळ शिवाला अन्न वाढायला मिळावं म्हणून पार्वती काशीच्या सर्व लोकांना, पशू-पक्षी-किटकांसह सर्वांना अन्नदान करू लागली. अखंड नगर फिरून कुठेच भिक्षा न मिळाल्याने शेवटी भगवान विश्वनाथ अन्नपूर्णेच्याच घरापुढे भिक्षा मागायला उभे राहिले. अशी किटकापासून सदाशिवापर्यंत सगळ्यांचे पोषण करणारी ही काशीपुराधीश्वरी माता अन्नपूर्णा ! तिची स्तुती करण्यासाठी आचार्यांनी एक सुंदर स्तोत्र रचले आहे.
नवमीच्या दिवशी करवीरनिवासिनी श्री अंबाबाई याच रूपात सजली आहे. ही पूजा केदार मुनीश्वर, प्रसाद लाटकर, रवी माईणकर आदिनाथ मुनीश्वर यांनी बांधली.