कृष्णा सावंत पेरणोली (ता. आजरा) : सात महिन्यांचे बाळ असताना बायको बाळाला सोडून गेली. काही कामधंदा नाही. या विवंचनेत सापडलेल्या बापाने चालत जाण्याचा निश्चय केला आणि गोव्याहून मुलगा खंडेरायाला पोटाशी घेऊन सोलापूरच्या दिशेने तो चालू लागला. हणमंत बाबूराव डोंबाळे (वय ३५, रा म्हालसवडे, ता. माळशिरस) याची ही कहाणी. आजऱ्यातील पोलीस व शिक्षकांच्या माणुसकीचे दर्शन त्यांच्या मदतीतून घडले.कोरोनाच्या संकटाचे चटके मोलमजुरी करणाऱ्यांना कसे बसत आहेत, हे बाळाला पोटाशी घेऊन चालत जाणाऱ्या बापाच्या परिस्थितीवरून स्पष्ट होते. हणमंत हे गोव्यात मजुरी करून कुटुंबाची गुजराण करीत होते. संसर्ग वाढल्यावर कामधंदा बंद झाला आणि त्याचा हणमंतच्या जगण्यावर परिणाम झाला. त्यामुळे त्याने मूळ गावी जाण्याचा निर्णय घेतला.
बाळासह आपल्यालाही बायको सोडून गेल्याने हणमंत यांच्या विवंचनेत भर पडली. गावाकडे जाण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने ४ आॅगस्टपासून आंबोली-आजऱ्याच्या दिशेने त्यांनी चालायला सुरुवात केली. वादळ, वारे, मुसळधार पावसातून मिळेल ते खात १५० किलोमीटर चालत गवसे (ता. आजरा) येथे तो पोहोचला. चेक पोस्ट नाक्याशेजारी भुकेने व्याकुळ झालेला व बाळाला घेऊन बसलेला हणमंत पोलीस कॉन्स्टेबल सचिन वायदंडे यांना दिसला. त्यांनी विचारपूस करून त्याला जेवणाचा डबा दिला. खंडेरायाला दूध दिले.
शिक्षक असलेल्या आनंदा पेंडसे, अनिल बोलके, जानबा पोवार, मारुती पाटील यांनी त्यांना आर्थिक मदत केली. इचलकरंजीकडे निघालेल्या खासगी वाहनात बसवून त्यांना पाठविण्यात आले. तेथून रविवारी त्यांचा पुढचा पायी प्रवास सोलापूरच्या दिशेने सुरू झाला.