पोहाळे तर्फ आळते : पोहाळे (ता. पन्हाळा) येथील खाद्य महोत्सवात कालबाह्य होत असलेल्या खरडा, भाकरी व माडगे यांचा समावेश लक्षवेधी ठरला. पोहाळे ग्रामपंचायत व महाराष्ट्र व्यवसाय प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने महिलांना विविध खाद्यपदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. सरपंच दादासो तावडे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी पन्हाळा तालुका सरचिटणीस इंद्रायणी चौगले, तलाठी सुवर्णा कराड यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पहिले दोन दिवस प्रशिक्षिका रूपाली शिंदे यांनी प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले. प्रशिक्षित महिलांनी खाद्य महोत्सवामध्ये हे पदार्थ प्रदर्शित केले. या खाद्य महोत्सवमध्ये ग्रामस्थांनी त्याचा आस्वाद घेऊन प्रशिक्षित महिलांचे कौतुक केले. ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सरपंच दादासो तावडे, उपसरपंच उमेश कुंभार, तलाठी सुवर्णा कराड, आशा स्वयंसेविका, आरोग्यसेवक, सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, बचत गटातील महिला यांनी परिश्रम घेतले.