कोल्हापूर : कोरोनामुळे जिल्ह्यातील कचरावेचकांची दयनीय अवस्था झाली आहे. शासनाने त्यांच्या हाताला काम द्यावे या मागणीसाठी सोमवारी अवनि संस्थेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांनी खर्डा भाकरी करून शासनाचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले.यावेळी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनामुळे भंगार गोळा करणे धोकादायक झाले आहे. दरही कमी असल्याने त्यातून उदरनिर्वाह होत नाही. त्यामुळे २०१६ च्या घनकचरा व्यवस्थापन कायद्यानुसार कचरावेचकांना कचरा वर्गीकरणाच्या कामात सामावून घ्यावे.
शहरात नागरी उपजीविका अभियानांतर्गत तर ग्रामीण भागात मनरेगाची व्याप्ती वाढवून त्यांना काम देण्यात यावे. वारांगणांप्रमाणे ५ हजार मानधन द्यावे. कचरावेचकांच्या कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा अनुराधा भोसले यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.