आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. 0७ : गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील खरिपाच्या क्षेत्रात तब्बल नऊ हजार हेक्टरची वाढ झाली आहे. साखर कारखान्यांचा लवकर संपलेला हंगाम, रब्बीच्या वाढलेल्या क्षेत्राचा एकंदरीत परिणाम म्हणून यंदा खरिपाचे क्षेत्र वाढले आहे. भात, खरीप ज्वारीच्या क्षेत्रात वाढ दिसत नसली तरी भुईमूग, सोयाबीन, तुरीच्या क्षेत्रात कमालीची वाढ दिसत आहे.
मागील हंगामात पाणीटंचाईमुळे उसाचे क्षेत्र घटले. खरिपाचे २ लाख ५७ हजार ४०० हेक्टरचे उद्दिष्ट होते. त्यापैकी २ लाख ४२ हजार ३०० हेक्टरवर पेरणी झाली. उसाचे क्षेत्र १ लाख ४१ हजार ९०० हेक्टर होते. यामध्ये ९ हजार आडसाली, ३५ हजार पूर्वहंगामी, तर ३९ हजार सुरूची लागण होती. जवळपास ५८ हजार हेक्टरवर खोडवा पीक होते. दुष्काळ आणि त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे यंदा साखर कारखान्यांना उसासाठी कसरत करावी लागली. कारखाने जेमतेम तीन-साडेतीन महिनेच चालले.
हंगाम लवकर संपल्याने जमिनी मोकळ्या झाल्या आणि रब्बीचे क्षेत्र आपोआपच वाढले. रब्बी काढल्याने आता त्या जमिनी खरिपाखाली आल्या आहेत. कृषी विभागाने २०१७-१८ या खरीप हंगामासाठी १ लाख ११ हजार ३०० हेक्टरचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवले असून, त्या दृष्टीने नियोजन केले आहे. गतवर्षीपेक्षा जवळपास नऊ हजार हेक्टर खरिपाचे क्षेत्र वाढले आहे. यामध्ये भुईमूग १६०० हेक्टर, सोयाबीन २४००, तूर १४००, मूग ७००, उडीद १७००, तर नागलीचे ८०० हेक्टरने क्षेत्र वाढले आहे. भाताचे १ लाख १० हजार तर खरीप ज्वारीचे ४० हजार हेक्टर क्षेत्र मात्र कायम आहे.
उसाच्या क्षेत्रातही फारसा बदल झाला नसून, १ लाख ४१ हजार हेक्टरवर उभा ऊस आहे. वळवाच्या हजेरीने शेतकऱ्यांची धांदल! यंदा वळवाने वेळेवर हजेरी लावली आहे. आतापर्यंत तीन-चार पाऊस झाल्याने मशागतीस वेग आला आहे. बांध धरणे, चोतकाडे वेचण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. दीड लाख टन खताला मंजुरी खरीप हंगामासाठी यंदा जिल्ह्यासाठी १ लाख ७८ हजार टन खताची मागणी केली होती. त्यापैकी १ लाख ५१ हजार ६०० टनाला मंजुरी मिळाली आहे.गतवर्षीचे १९ हजार टन शिल्लक आणि मंजुरीपैकी १७ हजार टन खतांची आवक झाली आहे. एप्रिल ते जुलैपर्यंत मंजूर खते टप्प्याटप्प्याने उपलब्ध होणार आहेत.
दृष्टिक्षेपात खरीप हंगाम
प्रमुख पिके सर्वसाधारण क्षेत्र उद्दिष्ट हेक्टर
भात १ लाख ८ हजार १ लाख १० हजार
ज्वारी ७ हजार २०० ४ हजार
नागली २१ हजार ४०० २२ हजार ५००
मका २ हजार ८०० ३ हजार ५००
तुर २ हजार ५०० ३ हजार
मुग २ हजार ३०० २ हजार ७००
उडीद २ हजार ५०० ३ हजार ५००
भुईमूग ५२ हजार १०० ५३ हजार ७००
सोयाबीन ५१ हजार ७०० ५६ हजार
ऊस १ लाख ४२ हजार ३०० १ लाख ४१ हजार ९००
यंदा खरिपाचे क्षेत्र वाढले असून, त्या दृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले आहे. बियाणे व खतांची पुरेशी उपलब्धता आहे. - चंद्रकांत सूर्यवंशी,
कृषिविकास अधिकारी, जिल्हा परिषद