भीमगोंडा देसाई -- कोल्हापूर -निसर्गाच्या अवकृपेमुळे खरीप हंगाम निराशाजनक गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बळिराजा मोठ्या अपेक्षेने आणि आशेने रब्बीच्या तयारीला लागला आहे. पीक काढणी झालेल्या क्षेत्रावर मशागत पेरणीलाही प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्र शासन आणि जिल्हा परिषद कृषी विभागाने आवश्यक बियाणे, खते यांची उपलब्धता केली आहे.यंदा खरीप हंगामाची वेळेत पेरणी झाली. मात्र, पावसाची वक्रदृष्टी राहिली. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली. पिके पोसवण्याच्या टप्प्यातच पावसाने पाठ फिरविली. खडकाळ जमिनीवरील पिके करपून गेली. सर्वत्र सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला. परिणामी त्याचा परिणाम उत्पादनावर जाणवत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून खरीप पीक काढणी सुरू झाली आहे. सध्या सोयाबीन, ज्वारी काढणीला वेग आला आहे. पीक काढणी झालेल्या क्षेत्रात पाठोपाठ मशागत करून रब्बीच्या पेरणीला प्रारंभ झाले आहे. गेल्या आठवड्यात परतीच्या मान्सूनने झोडपले. त्यामुळे रब्बीच्या पेरणीला पोषक परिस्थिती परिस्थिती आहे. खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन अपेक्षित मिळाले नाही. त्यामुळे रब्बी ज्वारी, गहू, हरबरा, मका आदी पिकांचे चांगले उत्पादन घेण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी केले आहे. ज्वारी, गहू, हरबरा यांचे बियाणे कृषी सेवा केंद्रांत उपलब्ध आहेत. गतवर्षी जिल्ह्यात ३० हजार २४७ हेक्टरवर रब्बीसाठी विविध पिकांची पेरणी झाली होती. यंदा ३३ हजार १०० हेक्टरवर रब्बीच्या पेरणीचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी दोन लाख २५ हजार ५०० मेट्रीक टन रासायनिक खतांची मागणी केली आहे. ज्वारीचे १५५०, गहू १८९०, हरबरा १३२३, सूर्यफूल ३०, मका ८८० इतके क्विंटल बियाणांची मागणी आहे. रब्बीबरोबरच कृषी विभागाने उन्हाळी भात, भुईमूग, मका, सूर्यफूल या पिकांचे १३९० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट होते. गेल्यावर्षी १२३७ हेक्टरवर पेरणी झाली होती. उन्हाळी हंगामातील आवश्यक बियाण्यांचीही मागणी करण्यात आली आहे. खरीप पीक काढण्याचे काम गतीने सुरू आहे. पाठोपाठ मशागत करून जिल्ह्यात रब्बी पिकांची पेरणीही सुरू आहे. आवश्यक बियाणांची मागणी केली आहे. काही प्रमाणांत बियाणे कृषी सेवा केंद्रात उपलब्ध झाली आहेत. रब्बी हंगामात बियाणे व रासायनिक खतांची टंचाई भासू नये, याची खबरदारी कृषी विभाग आतापासूनच घेत आहे.- चंद्रकांत सूर्यवंशी, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद पेरक्षेत्रचे नियोजनपीकनिहाय जिल्ह्यातील पेरक्षेत्रचे नियोजन व कंसात गेल्यावर्षीचे हेक्टरनिहाय असे : ज्वारी - १५५०० (१५४६५), गहू - ५४००(४०२६), हरभरा - ६३०० (५४१७), सूर्यफूल - ३००(२८२), मका - ५५०० (५०५७), करडई - १०० (०).रासायनिक खतांची मागणी अशीतालुकानिहाय रासायनिक खतांची मागणी मेट्रीक टनात अशी : आजरा - ९०२०, भुदरगड - ६७६९, चंदगड - १५७९०, गडहिंग्लज - ११२८१, गगनबावडा - २२६०, हातकणंगले - २९३२०, कागल - २९३२०, करवीर - ५४०९१, पन्हाळा - १८०४०, राधानगरी - १३५३१, शाहूवाडी - ४५०९, शिरोळ - ३१५६९.
खरीपने गुंडाळला गाशा, आता ‘रब्बी’कडून अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2015 12:17 AM