कोल्हापूर : अक्षय मेथे-पाटील, रणजित विचारे यांच्या गोलच्या जोरावर पाटाकडील तालीम मंडळ (अ) ने खंडोबा तालीम मंडळ (अ)चा पराभव करत ‘चंद्रकांत फुटबॉल महासंग्राम’ स्पर्धेत विजयी घोडदौड कायम ठेवली. सामन्यात ‘खंडोबा’चा गोलरक्षक रणवीर खालकर याचे अप्रतिम गोलरक्षण सामन्याचे वैशिष्ट्य ठरले.
शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत बुधवारी पाटाकडील व खंडोबा या दोन संघांत साखळी फेरीतील सामना झाला. सामन्याच्या प्रारंभापासून दोन्ही संघांनी आक्रमक व वेगवान चाली रचल्या. ‘खंडोबा’कडून कपिल शिंदे, सागर पोवार, प्रतीक सावंत, ऋतुराज संकपाळ, सिद्धार्थ शिंदे यांनी गोल करण्यासाठी अनेक चाली रचल्या. कपिल शिंदेने ‘पाटाकडील’च्या गोलक्षेत्रात तीनदा गोल करण्याचे प्रयत्न केले.
यात दोनवेळा गोलपोस्टला चेंडू तटून बाहेर गेला, तर ‘पाटाकडील’कडून हृषीकेश मेथे-पाटील, अक्षय मेथे-पाटील, ओबे अकीम, डेव्हिड इथेलो, रणजित विचारे, ओंकार जाधव, यांनी कधी डाव्या बाजूने, तर कधी उजव्या बगलेतून चेंडू खंडोबा (अ) संघाच्या गोलक्षेत्रात सातत्याने धडक मारली. पाटाकडील(अ) च्या सर्व चढाया खंडोबा(अ)चा गोलरक्षक रणवीर खालकरने कधी हवेत, तर कधी डावीकडे व उजवीकडे झेपावत रोखल्या. पूर्वार्धात पाटाकडील संघाकडून निश्चित गोल समजणाऱ्या असे फटके खंडोबा गोलरक्षक रणवीरने परतावून लावले. पूर्वार्धात सामना गोलशून्य बरोबरीत राहीला.
उत्तरार्धात पाटाकडील(अ)कडून रणनीतीत बदल करत रणजित विचारे, डेव्हिड इथेलो, ओबे अकीम, यांनी वेगवान चाली रचल्या. त्याही ‘खंडोबा’चा गोलरक्षक रणवीरने निष्फळ ठरविल्या. ‘खंडोबा’कडून कपिल शिंदे याने ‘पाटाकडील’च्या गोलक्षेत्रातून थेट फटका मारून गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न ‘पाटाकडील’चा सजग गोलरक्षक विशाल नारायणपुरे याने लीलया परतावून लावला. ६९ व्या मिनिटास ‘पाटाकडील’कडून ओबे अकीमने ‘खंडोबा’च्या गोलक्षेत्रातून थेट फटक्याद्वारे गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचे प्रयत्न ‘खंडोबा’चा गोलरक्षक रणवीरने हाताने पंच करत परतावून लावले. परतावून पुन्हा मैदानात आलेल्या चेंडूवर ताबा घेत ‘पाटाकडील’च्या अक्षय मेथे-पाटीलने गोल करत संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली.
७० व्या मिनिटाला पुन्हा यश मिळाले. ओबे अकीमच्या पासवर रणजित विचारे याने गोल करत संघाचा दुसरा गोल फलकावर लावला. दोन गोलमुळे काहीसा गोंधळलेला खंडोबा संघ तत्काळ सावरला पण त्यांना यश आले नाही. सामना जिंकत पाटाकडील तालीम संघाने साखळी फेरीत सहा गुणांची कमाई केली. ‘सामनावीर’ म्हणून पाटाकडीलच्या रणजित विचारे यास गौरविण्यात आले.कोल्हापुरातील शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या चंद्रकांत फुटबॉल महासंग्राम स्पर्धेत बुधवारी पाटाकडील तालीम मंडळ (अ) व खंडोबा तालीम मंडळ (अ) यांच्यात झालेल्या सामन्यातील एक अटीतटीचा क्षण.