कोल्हापूर : मानकरी आणि काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत शहरात बुधवारी रात्री खत्तलरात्रीचा विधी झाला. पंजेभेटीही प्रतीकात्मक पद्धतीने झाल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेऊन मोहरम सणामधील पारंपरिक विधी पार पडला. कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. गुरुवारी पंजे विसर्जन केले जाणार आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कायम असल्याने शहरातील विविध तालमी, संस्थांनी साध्या पद्धतीने मोहरम साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गेल्या आठवड्यापासून पंजांची प्रतिष्ठापना झाली. शहरात सुमारे १२०० पंजांची प्रतिष्ठापना झाली आहे. हजरत बाबूजमाल शहाजमाल कलंदर रहमतुल्लाअलै दर्गा शरीफ, खंडोबा तालीम मंडळ, सणगर-बोडके तालीम मंडळ, बाराईमाम, काळाईमाम, भवानी मंडप, जुना राजवाडा येथील वाळव्याची स्वारी, दिलबहार तालीम मंडळ, बालगोपाल तालीम मंडळ, कोळेकर तिकटी, नंगीवली तालीम मंडळ, आदी परिसरांमध्ये खादीम, मानकरी अशा मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये खाई फोडण्याचा पारंपरिक विधी साध्या पद्धतीने झाला. बाबूजमाल दर्गा येथे मोहरममधील नववीचा विधी झाला. तेथील मानाची खाई अमीन झारी यांनी फोडली. कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे, अशी प्रार्थना उपस्थितांकडून करण्यात आली. यावेळी दर्गाचे खादीम, मानकरी उपस्थित होते. दरम्यान, बाबूजमाल आणि घुडणपीर दर्ग्यांच्या मार्गावरील प्रमुख चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात होता.
चौकट
कोरोना नियमांचे पालन करीत दर्शन
मोहरममधील प्रमुख दिवस असल्याने बुधवारी पंजे प्रतिष्ठापना झालेल्या ठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी उपस्थिती लावली होती. कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करीत त्यांनी दर्शन घेतले. त्यांना प्रसाद वाटप करण्यात आला.