जोतिबा: श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर २० फेब्रुवारीला खेट्याची यात्रा होणार आहे. कोरोना पार्श्वभूमीवर यावर्षीही खेट्याची यात्रा होणार की नाही? असा भाविकांमध्ये आणि जोतिबा डोंगर येथील पुजारी वर्गामध्ये संभ्रम होता, हा संभ्रम जिल्हाधिकाऱ्यांनी दूर केला. २० फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या खेट्याच्या यात्रेला जिल्हाधिकाऱ्यांनी हिरवा कंदील दाखवला आहे.भाविकांना मंदिर प्रवेशासाठीचे कोरोनाचे निर्बंध शिथील करण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करून सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासनही जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून जोतिबाची खेट्याची यात्रा रद्द करण्यात आल्या होत्या. त्या यावर्षी देखील होणार की नाही, असा भाविकांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये होता. पण आज जोतिबा डोंगर येथे झालेल्या जिल्हा प्रशासन आणि जोतिबा ग्रामस्थांमध्ये यात्री निवास येथे झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी यावर्षीची खेट्याची यात्रा होणार असल्याचे स्पष्ट करून हा संभ्रम दूर केला.
यावेळी सरपंच राधा बुणे, ग्रामपंचायत सदस्य सुनिल नवाळे, सामाजिक कार्यकर्ते गोरख बुणे, नवनाथ लादे यांनी ई पास रद्द करणे, मंदिराची चारी दरवाजे खुली करणे, कुलाचार विधीसाठी पुजाऱ्यांना स्वंतत्र मार्ग खुला करणे, १० वर्षाखालील मुलांना मंदिरात प्रवेश देण्याची मागणी केली.
यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिले. याचबरोबर भाविकांनी आणि पुजारी वर्गाने ही खेट्याची यात्रा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाला आणि मंदिर व्यवस्थापनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.या बैठकीला जिल्हा पोलीस प्रमुख बलकवडे, प्रांताधिकारी अमित माळी, पन्हाळा तहसिलदार रमेश शेंडगे, देवस्थान समितीचे प्रभारी सचिव शिवराज नायकवडी, कोडोली पोलिस स्टेशनचे सपोनि शितलकुमार डोईजड, उपसरपंच शिवाजीराव सांगळे, देवस्थान समितीचे इनचार्ज दिपक म्हेत्तर , सुयश पाटील ,ग्रामस्थ पुजारी उपस्थित होते. दरम्यान खेटे यात्रा नियोजनाची पाहणी जोतिबा मंदिरात करून संबंधित अधिकाऱ्यांना सुचना दिल्या .