कोल्हापूर : चाळीस हजार रुपयांची लाच घेतल्याचे सिद्ध झाल्याप्रकरणी अटकेत असलेला ‘भारत राखीव बटालियन ३’ चा सेवानिवृत्त समादेशक संशयित खुशाल विठ्ठल सपकाळे (वय ५९, रा. मरोशी, भवानीनगर, मरोळ, मुंबई) याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता कळंबा कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार सीपीआर रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली. सोमवारी (दि. ११) त्याच्या जामिनावर सुनावणी आहे. गुरुवारी (दि. ७) पुणे विभागाचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजकुमार गायकवाड यांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली.गट मुख्यालय येथील क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यासाठी खेळाडू जवानांना शासनाकडून दिला जाणारा आहार, भत्ता नियमित वाटप करण्यासाठी व सोसायटीकडून एक लाख रुपये कर्ज मंजूर करण्यासाठी जवानांकडून ४० हजार रुपयांची लाच घेतल्याचे प्रकरण जुलै २०१८ मध्ये उघडकीस आले होते. या प्रकरणी सपकाळेला अटक केली होती.
सपकाळेचा खासगी कारचालक रॉबर्ट याचाही यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे; त्यामुळे त्याचा शोध सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास सपकाळेची कळंबा कारागृहात रवानगी करण्यात आली.