कोल्हापूर : फूस लावून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला. प्राजक्ता भारत लोहार (वय १७, रा. कडगाव, ता. गडहिंग्लज) असे त्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी तिच्या वडिलांनी पोलिसांत फिर्याद दिली. याबाबत पोलिसांनी सांगितले, प्राजक्ता ही कोल्हापुरातील जागृतीनगर येथे आजीकडे राहण्यास आली होती. दि. १६ डिसेंबर २०१४ रोजी अज्ञात तरुणाने फूस लावून तिचे अपहरण केले. या प्रकरणी तिच्या वडिलांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. प्राजक्ता ही इस्लामपूर परिसरात राहत असल्याचे नातेवाइकांकडून सांगितले जात आहे; परंतु शोध घेतला असता ती मिळून आलेली नाही. तिचे अपहरण कोणी केले याचीही माहिती तिच्या वडिलांनाही नाही. प्रेमप्रकरणातून हा प्रकार झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. प्राजक्ता ही रंगाने निमगोरी, अंगाने मध्यम, उंची पाच फूट, चेहरा उभट आहे. या वर्णनाची मुलगी दिसून आल्यास राजारामपुरी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक पोलीस उपनिरीक्षक अशोक वाडीकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
अल्पवयीन मुलीचे अपहरण; अज्ञात तरुणावर गुन्हा
By admin | Published: January 06, 2015 12:41 AM