कोल्हापूर : ट्रेड कंपनीत गुंतवणूक केलेल्या ३० लाखांच्या वसुलीसाठी मध्यस्थीचे अपहरण करून त्याच्याकडून काही रक्कम, फ्लॅटच्या चाव्या जबरदस्तीने काढून घेतल्या तसेच ३० लाखांचे धनादेश लिहून घेऊन ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत सुरेंद्र भगवानराव मोटे (रा. मुक्तसैनिक वसाहत) यांच्या तक्रारीवरून मंगळवारी सायंकाळी महिलेसह दोघांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. आणखी अनोळखी सहा संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.अटक केलेल्यांची नावे, श्रध्दा राकेश अग्रवाल ऊर्फ शिंदे (वय ३४ रा. यड्राव, ता. शिरोळ), मोटारचालक निवास बाबासाहेब तांबे (वय ३६, रा. तांबे मळा, इचलकरंजी).पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुरेंद्र मोटे यांच्या संगणक क्लासमध्ये श्रध्दा शिंदे ऊर्फ अग्रवाल शिकण्यासाठी येत होत्या. मोटे यांनी मित्राच्या ओळखीतून काही रक्कम अभिजित सावंत (रा. शारदा विहार, हॉकी स्टेडियम) याच्या शुभ ट्रेड कंपनीत गुंतवली. त्यांना मिळालेला परतावा पाहून श्रध्दा अग्रवाल यांनीही गुंतवणुकीची इच्छा दर्शवली. त्यांनी मोटे यांच्या ओळखीने शुभ ट्रेडर्समध्ये प्रथम १० लाख गुंतवले. आकर्षक परताव्यामुळे अग्रवाल यांनी परस्पर इतर अशी एकूण ६३ लाख रुपये गुंतवल्याचे फिर्यादीत सांगितले.दरम्यान, शुभ ट्रेडर्सकडून ताराबाई पार्कमधील कार्यालयात आतापर्यंत अग्रवाल यांच्या बँक खात्यावर २३ लाख ६९ हजार १११ रुपये परतावा जमा झाला, तोपर्यंत कंपनी बंद पडली; पण संशयित अग्रवाल यांनी उर्वरित ३० लाखांच्या वसुलीसाठी मोटे यांना वेळोवेळी धमकावून त्यांच्याकडून ७ लाख ७० हजार रुपये वसूल केेले.दरम्यान, गुरुवारी (दि. ८) सुरेंद्र मोटे हे मित्र जनार्दन चव्हाणसोबत टाकाळा येथे गेले होते. संशयित अग्रवाल या अनोळखी सहाजणांना घेऊन तेथे आल्या. त्यांनी मोटे व चव्हाण यांना जबरदस्तीने मोटारीत बसवून त्यांच्या राजारामपुरी ८ वी गल्लीतील फ्लॅटवर नेले. तेथून पुन्हा चव्हाणवाडीतील फ्लॅटवर नेऊन त्यांच्याकडून जबरदस्तीने ५ लाख व २५ लाख रकमेचे दोन धनादेश लिहून घेतले. त्यांच्याकडील २० हजार रुपये काढून घेऊन ठार मारण्याची धमकी दिली.याबाबत सुरेंद्र मोटे यांनी मंगळवारी दुपारी शाहूपुरी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी श्रध्दा अग्रवाल-शिंदे व त्यांचा मोटारचालक निवास कांबळे यांना अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील करत आहेत.
Crime News: तीस लाखांसाठी मध्यस्थीचे अपहरण, ठार मारण्याची धमकी; महिलेसह दोघे अटक
By इंदुमती सूर्यवंशी | Published: July 13, 2022 6:36 PM