सांगली : एबी निगेटिव्ह रक्तगट असलेल्या बेळगाव येथील एका रुग्ण महिलेला कोल्हापूरच्या रक्तदात्याच्या तत्परतेमुळे जीवदान मिळाल्याची घटना रविवारी घडली. बॉम्बे ओ ब्लड ग्रुप आॅर्गनायझेशनच्या समन्वयामुळे रुग्णाला वाचविण्यात यश मिळाले असून, रक्तदात्यांच्या या चळवळीचे रुग्णालय प्रशासनाने कौतुक केले.बेळगाव येथील केएलई रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी शारदा राठोड नावाच्या रुग्ण महिलेस हृदयावरील शस्त्रक्रियेसाठी दाखल केले. त्यांचा रक्तगट दुर्मीळ असल्याने रुग्णालय प्रशासनाने कर्नाटकातील सर्व रक्तपेढ्यांशी संपर्क साधला, मात्र त्यांना कुठेही ते उपलब्ध झाले नाही. दुसरीकडे महिलेची प्रकृती चिंताजनक होत होती. लवकर शस्त्रक्रिया करणे महत्त्वाचे होते. महाराष्टÑातील रक्तपेढ्यांमधून रक्त मागविण्यात तांत्रिक अडचणी असल्याने रक्तदाता मिळविण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने प्रयत्न चालविले. त्यांना तासगाव येथील बॉम्बे ओ ब्लड ग्रुप आॅर्गनायझेशनविषयी माहिती होती. त्यामुळे त्यांनी या ग्रुपचे प्रमुख विक्रम यादव यांना संपर्क केला आणि मदतीची अपेक्षा व्यक्त केली. यादव यांनी कोल्हापूर येथील एबी निगेटिव्ह रक्तगट असलेले उमेश जगदाळे यांच्याशी संपर्क केला. त्यांनी कर्नाटकात जाऊन रक्तदान करण्याची तयारी दर्शविली. तातडीने त्यांनी रविवारी दुपारी बेळगावातील केएलई रुग्णालय गाठले. या रक्तपुरवठ्यामुळे शस्त्रक्रियेचा मार्ग सुकर झाला. राठोड कुटुंबीयांनी व रुग्णालय प्रशासनाने रक्तदाते जगदाळे यांचे कौतुक करताना बॉम्बे ब्लड ग्रुप आॅर्गनायझेशनचेही आभार मानले. त्यांच्या चळवळीने सारेच भारावून गेले.पदरमोड करून खरे दानकोल्हापूरचे रक्तदाते उमेश जगदाळे यांनी स्वखर्चाने बेळगावला जाऊन कोणत्याही अपेक्षेविना रक्तदान केले. त्यामुळे गरीब रुग्णाच्या नातेवाइकांच्या डोळ्यांत त्यांच्या दातृत्वाने पाणी आले.
कोल्हापूरच्या रक्तदात्याकडून कर्नाटकातील महिलेला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:52 AM