कोल्हापूर : जिल्हा क्षयरोगमुक्त करण्याच्या हेतूने सुरू करण्यात आलेल्या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात क्षयरुग्णांची शोधमोहीम सुरू होत आहे. सोमवार (दि. ६)पासून घरोघरी जाऊन अशा प्रकारचे रुग्ण शोधून त्यांच्यावर सरकारी व खासगी दवाखान्यात मोफत उपचार होणार आहेत. १९ मेपर्यंत हा सर्व्हे सुरू राहणार आहे, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा कुंभार यांनी पत्रकार बैठकीत दिली.मागील काही काळापासून कार्यक्रमांतर्गत क्षयरुग्णांची नोंदणी होण्याचे प्रमाण कमी होत आहे. फुप्फुसाचा क्षयरोग असणारे बरेचसे रुग्ण, होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे व त्याबाबत डॉक्टरांकडे जाण्याचे टाळत असल्याचे आढळले आहे. त्यामुळेच क्षयरुग्ण शोधमोहीम हाती घेतली आहे.
या अंतर्गत जोखमीच्या भागांमध्ये झोपडपट्टी, स्थलांतरित वस्त्या, औद्योगिक, असंघटित क्षेत्र, वीटभट्टी, दगड फोडणारे, खाण वसाहती, इत्यादी ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांवर जास्त लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यांच्याजवळ पोहोचण्यासाठी दुर्गम भागांमध्ये आरोग्य विभागातील आरोग्य कर्मचारी, ए. एन. एम., एम. पी. डब्ल्यू. आशा कार्यकर्ती हे प्रत्यक्ष जाऊन, घरोघरी भेट देऊन संशयित क्षयरुग्णांची तपासणी करणार आहेत.लक्षणे सापडल्यास मोफत चाचण्या करून, निदान झाल्यास औषधोपचारही सुरू करणार आहेत. उपचार व आहारासाठी प्रत्येक क्षयरुग्णाच्या बँक खात्यामध्ये दरमहा ५०० रुपये जमा होणार आहेत. जिल्ह्यातील जोखमीच्या कार्यक्षेत्रांतील ३ लाख ५५ हजार ५३८ लोकसंख्येची निवड झाली आहे.
३०२ कर्मचारी पथके काम करणार आहेत. पत्रकार परिषदेस क्षय व उरोरोग विभागप्रमुख डॉ. अनिता सैबन्नावर, वैद्यकीय अधिकारी (डी. टी. सी.) डॉ. मानसी कदम, डॉ. विनायक भोई व जिल्हा क्षयरोग केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये २०१८ मध्ये २६१४ नवीन क्षयरुग्ण आढळले. त्यांपैकी ४८१ जणांनी खासगी दवाखान्यांत, तर २१३३ क्षयरुग्णांनी सरकारी रुग्णालयांत उपचार घेतले. जानेवारी ते मार्च २०१९ पर्यंत ६४५ नवे रुग्ण आढळले. त्यांपैकी ११९ खासगीकडे, तर ५२६ रुग्ण सरकारी केंद्रांकडून उपचार घेत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात आजअखेर ३७४ इतके एम डी आर रुग्ण व ३३ एक्स डी आर रुग्ण आढळले आहेत.
क्षयरोगाची लक्षणेदोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधीचा खोकला, ताप, छातीत दुखणे, वजनात लक्षणीय घट, थुंकीवाटे रक्त पडणे अशा रुग्णांनी या मोहिमेअंतर्गत मोफत तपासणी करून घ्यावी. तसेच यापूर्वी क्षयरोगाचे उपचार घेतलेल्या रुग्णांनीही आपला बेडका नमुना तपासणीकरिता आरोग्य कर्मचाऱ्यांकडे द्यावा व मोहीम कालावधीमध्ये घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य ती माहिती द्यावी.