लोकमत न्यूज नेटवर्कबेळगाव : सर्वपित्री अमावास्येच्या रात्री लहान मुलीचा बळी देऊन गुप्तधन मिळविण्याचा कट बेळगावात नागरिकांच्या सतर्कतेमुळे उधळला आहे. बेळगावातील भडकल गल्लीत हा प्रकार घडला असून या प्रकरणी शिरिना जमादार या महिलेला अटक करण्यात आली आहे. तर मसाबी मुल्ला, जावेद मुल्ला, फारूक मुल्ला आणि सोना मुल्ला असे चौघेजण फरार झाले आहेत.
येथील भडकल गल्लीत गौस पिरजादे यांच्या घरात मुल्ला कुटुंबिय भाड्याने राहते. त्यांनी चौदा महिन्यांच्या बालिकेसह एकूण पाच मुलांचा नरबळी देऊन गुप्तधन मिळविण्याची योजना आखली होती. नरबळी दिल्यास मोठ्या प्रमाणावर गुप्तधन मिळते असे मांत्रिकाने त्यांना सांगितले होते. मांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे नरबळी देण्यासाठी सर्व तयारी करण्यात आली होती. घरात आठ फूट खोल आणि आठ फूट रुंदीचा खड्डा खणण्यात आला होता.
एका घागरीत लिंबू, कुंकू, उदबत्ती, फळे, आदी साहित्य आणून ठेवण्यात आले होते. मांत्रिकाने बळी देताना काळ्या रंगाचा मुखवटा मुलांच्या तोंडावर घाला असा सल्ला दिला होता. त्याप्रमाणे काळे मुखवटेदेखील आणून ठेवण्यात आले होते; पण खड्डा खणण्यासाठी येणाºया आवाजामुळे आणि लहान मुलीच्या ओरडण्याच्या आवाजामुळे नरबळीचा प्रयत्न फसला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आजूबाजूच्या लोकांनी दरवाजा वाजविण्यास सुरू केल्यावर घराच्या मागच्या दरवाजाने चारजण फरार झाले. यावेळी नागरिकांनी शिरींना जमादार हिला पकडून पोलिसांच्या हवाली केले. गेल्या तीन वर्षांपासून मुल्ला कुटुंबीय त्या घरात भाड्याने राहत होते. अमावास्येच्या दिवशी घर रिकामे करणार असल्याचे देखील त्यांनी पिरजादे यांना सांगितले होते. मसाबी मुल्ला, जावेद मुल्ला, फारूक मुल्ला आणि सोना मुल्ला अशी नरबळी देण्याच्या कटात सहभागी असणाºयांची नावे असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मार्केट पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद झाली आहे.रडण्याच्या आवाजाने बिंग फुटलेपिरजादे यांची चौदा महिन्यांची मुलगी खतिजा सकाळपासून गायब होती, म्हणून तिचा शोध घेण्यात येत होता. दुपारी दीड वाजता खतिजाच्या ओरडण्याचा, रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यावेळी बंद घराचा दरवाजा उघडून आजूबाजूचे लोक घरात गेले असता नरबळीचा प्रकार उघडकीस आला.