कोल्हापूर : जिभेवर रेंगाळणारी चव आणि सुगंधाने घायाळ करणारा, ‘कोकणचा राजा’ असे बिरूद मिरविणारा हापूस आंबा बुधवारी कोल्हापुरात दाखल झाला. मुहुर्ताच्या सौद्याला देवगड हापूसच्या पाच डझनांच्या पेटीला ११ हजार ५०० रुपये इतका आजवरचा उच्चांकी दर मिळाला.बाजार समितीत बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास आंब्यांच्या मुहूर्ताचा सौदा जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे व विशेष लेखापरीक्षक बी. बी. यादव यांच्या हस्ते निघाला. बाजार समितीचे नूतन सभापती बाबासो लाड, उपसभापती अमित कांबळे यांच्यासह सर्व संचालक व सचिव, उपसचिव सौद्यात सहभागी झाले.सौद्यासाठी म्हणून पाच डझनांच्या सहा पेट्या फळ व भाजीपाला बाजारात दाखल झाल्या होत्या. यात यासीन बागवान यांच्या अडत दुकानी रत्नागिरी हापूसच्या सचिन वायंगणकर यांच्या बागेतील चार पेट्या, तर इकबाल बागवान यांच्या अडत दुकानी देवगड हापूसच्या सचिन गोवेकर यांच्या बागेतील दोन पेट्या सौद्यात होत्या.
पहिल्या पाच डझनांच्या पेटीला लागलेली ११ हजार ५०० रुपयांची बोली प्रसाद नंदकुमार वळंजू यांनी जिंकली. दुसऱ्या पेटीचा सौदा ११ हजार १ रुपयांनी निघाला. त्यानंतरच्या चार पेट्या मात्र ६ हजार ५०० ते १० हजार रुपये या दरात सौद्याच्या ठिकाणीच विकल्या गेल्या.