जयसिंगपूर : ‘आम्ही रसिक’ जयसिंगपूर आयोजित नाट्यशुभांगी यांच्या सहकार्याने येथील नगरपालिकेच्या खुल्या नाट्यगृहात सुरू असलेल्या एकांकिका स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी आशयघन एकांकिकेनी गाजविला.कलाकारांच्या जीवनातील संघर्षमय भूतकाळ (निसर्गराज बसरे) व वर्तमानकाळ (राहुल साळुंखे) यांनी ‘राजा’ या एकांकिकेतून सादर केला. श्री साई सानिका क्रिएशन, नवी मुंबई यांनी या एकांकिकेचे उत्कृष्ट सादरीकरण केले. प्रशांत दामले फॅन फौंडेशन, पुणे यांची ‘जेव्हा यम हरला’ ही वसंत सबनीस यांची एकांकिका लक्षणीय ठरली. विनोदी ढंगातील ही एकांकिका कलाकारांनी समर्थ अभिनयाने पेलली. एकांकिकेने प्रेक्षागृह खदखदून गेला.व्यक्ती पुणे यांच्या ‘प्रतिगंधी’ने मात्र रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला. भ्रष्टाचार हाच शिष्टाचार समजणाऱ्या या देशात भ्रष्टाचार करू न शकणाऱ्या मध्यमवर्गीय नोकरदारांची काय हालत होते याचे सुंदर सादरीकरण या एकांकिकेतून झाले. सर्वच कलाकारांचे अभिनय उत्कृष्ट होते. सुयश यांचा विविधांगी अभिनय व नेपथ्य लक्षात राहण्यासारखे होते.महाशाला कलासंगम, गोवा या संस्थेने ‘महाद्वार’ ही एकांकिका सादर केली. आनंद व सुख मिळविण्यासाठी माणूस भौतिक गोष्टींच्या मागे आयुष्यभर धावत असतो, पण त्याला आंतरिक समाधान व शांती मिळत नाही. त्याच समाधानाच्या शोधार्थ त्याच्या धडपडीवर चाललेले मार्मिक भाष्य म्हणजे महाद्वार एकांकिकेतील अभिनय व पार्श्वसंगीत उत्कृष्ट होते. प्रताप गोवकर यांचे दिग्दर्शनही उत्तम होते.पिंपरी-चिंचवड आमचे आम्ही संस्थेने केलेल्या ‘लेखकांना फुजा’ या एकांकिकेने रसिकांच्या भविष्यकाळ व वर्तमानकाळावर भाष्य केले. मनोज डाळिंबकर यांचा अभिनय, रंगमंचावरील वावर लक्षात राहण्यासारखे होता. दिग्दर्शनही सर्वोत्कृष्ट होते. लेखक टी.व्ही. वरील मालिका, चित्रपट यांच्या लेखनात कसा वाहवत जातो व तत्त्वांना कसा मुरड घालतो हे दाखविण्याचा या एकांकिकेत उत्तम प्रयत्न केला आहे.रंगमुद्रा प्रतिष्ठान, अहमदनगर यांच्या ‘पालथ्या घड्यावर पाणी’ या विनोदी एकांकिकेने सत्राचा शेवट झाला. राहुल सोलापूरकर यांनी लिहिलेल्या या एकांकिकेचे सादरीकरण उत्तम झाले. अर्चना खरपुडे यांचा अभिनय उत्तम होता. एकांकिकेनी प्रेक्षकांना हसविले.
‘राजा’ने प्रेक्षकांना हसविले
By admin | Published: February 15, 2016 12:56 AM