हातकणंगले तालुक्यातील किणी, घुणकी व वाठार तर्फ वडगाव ही मोठ्या लोकसंख्येची गावे आहेत. या तिन्ही गावांच्या वारणा नदीवर स्वतंत्र नळपाणी पुरवठा योजना आहेत. कोरोनाकाळातील या दोन वर्षांत पाणीपट्टी व घरफाळा वसुली कमी झाला असून ग्रामपंचायतींचा खर्च वाढल्याने पाणी पुरवठा योजनांच्या वीजबिलाची थकबाकी वाढली आहे. त्यामुळे गावच्या योजनांचा शुक्रवारी वीज पुरवठा खंडित करण्यात आला. किणी गावची ४० लाख, घुणकीची १२ लाख तर वाठार गावची ३९ लाख रुपये थकबाकी आहे. महावितरण कंपनीने तिन्ही गावच्या ग्रामपंचायतींना थकीत बिलापैकी किमान ५० टक्के रक्कम भरण्याबाबत कळविले होते. पण त्यांनी बिल न भरल्याने नळपाणी पुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित केला असल्याचे महावितरणच्या वाठार उपकेंद्राचे उपअभियंता एस. एस. हुजरे यांनी सांगितले.
ग्रामपंचायतीशी यांच्याशी संपर्क साधला असता, महावितरणच्या अभय योजनेनुसार किणी ग्रामपंचायतीने थकबाकीच्या हप्त्यांचा भरणा केला आहे. यानंतर महावितरणने १२ लाख ५० हजार रुपये व्याजाची रक्कम थकबाकीतून कमी न करता उलट त्यावरच व्याज आकारणी करून त्याचे १७ लाख रुपये केले आहेत. यातील पाच लाख रुपये भरण्यास तयारी असून पाच लाख रुपये पंधरा दिवसांची मुदत मागितले असल्याचे उपसरपंच अशोक माळी यांनी सांगितले. तर वाठार ग्रामपंचायत ३९ लाख रुपयांपैकी ९ लाख रुपये व्याज असून आता दहा लाख रुपये भरण्यास तयार आहेत. तर घुणकी ग्रामपंचायतीच्या वतीने हप्ते पाडून देण्यात यावे, अशी मागणी असताना महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मनमानी करत वीज पुरवठा खंडित केला असल्याचे सांगितले तातडीने वीज पुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी ग्रामपंचायतीकडून करण्यात येत आहे.