जिल्हा प्रशासन असो की वन खाते; वर्षाला काही कोटी झाडे लावण्याचे नियोजन केले जाते. ती लावलीही जातात; परंतु त्यांचे पुढे काय होते, हे समजत नाही; कारण त्या झाडांची निगा घेतली जात नाही. पावसाळा संपला की लावलेली झाडे वाळून मरून जातात. झाडे मेली म्हणून आपण त्या यंत्रणांवर टीकेची झोड उठवतो; परंतु माझे कर्तव्य म्हणून मी स्वत: किती झाडे लावली व ती वर्षभर निगा राखून जगवली का, असा विचार होत नाही. तो रुजला गेला तरच खऱ्या अर्थाने निसर्गाचे संवर्धन होईल. म्हणून ‘पर्यावरण दिना’चे औचित्य साधून ‘लोकमत’ने अशा झाडे जगविणाऱ्या भगीरथांचा शोध घेतला. त्यांनी केलेले काम निसर्ग फुलविणारे आहे...या भगीरथांची ओळख करुन देणारी मालिका आजपासून....विश्वास पाटील । लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मी आज चार झाडे लावली. ती चांगली वाढली आणि दुपारच्या रणरणत्या उन्हात एखादा माणूस त्यांच्या सावलीत बसला तर माझ्या धडपडीचे चीज झाले, अशी भावना किरण भोसले यांनी व्यक्त केली.कोल्हापुरातील रचनाकार सोसायटीतील भोसले हे सरकारी नोकरीतून निवृत्त झालेले. त्यांच्या स्वत:च्या बंगल्याच्या आवारात त्यांनी कित्येक झाडे लावून ती जगविली आहेत; परंतु गेल्या वर्षी त्यांनी समोरच्या तपोवन मैदानावर करंजी, कडूनिंब, वड आणि आपट्याचे झाड अशा विविध जातींची ४० झाडे लावली. त्यांना स्वखर्चातून प्रत्येकी दीडशे रुपये खर्च करून लाकडीकुंपण लावून घेतले. शेणखत, आंतरमशागत करून ती चांगली जगविली. उन्हाळा सुरू झाल्यावर भोसले हे अरुण राजाज्ञा व सुनील वाळवेकर यांच्या मदतीने या झाडांना तीन दिवसांतून एकदा बादलीने पाणी घालतात. लावलेली सर्व ४० झाडे चांगली वाढली आहेत. रोज सकाळी उठल्यावर आपली झाडे कशी आहेत, हे पाहणे याचा त्यांना छंदच लागला आहे. झाडे पाहून आले की मनाला समाधान वाटते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. रचनाकार सोसायटी किंवा स्वत: भोसले यांच्या बंगल्यापासून ही झाडे लांब आहेत. हे मैदान विद्यापीठ सोसायटीचे आहे; परंतु तिथे आतापर्यंत कधीच कुणी झाडे लावलेली नाहीत. आपल्या आवारात आता झाडे लावता येत नाहीत, तर किमान समोरच्या मैदानावर तरी विविध प्रकारची झाडे लावावीत, असा विचार त्यांनी केला. मला त्या झाडांची सावली मिळणार नसेल, तर मी कशाला झाडे लावू, असा संकुचित विचार त्यांच्या मनाला शिवला नाही. झाडे जगविणाऱ्यांना आवाहनझाडे जगविणाऱ्या भगीरथांची ओळख करून देणारी मालिका ‘लोकमत’मार्फत आज, सोमवारपासून सुरूहोत आहे. किमान दहापेक्षा जास्त झाडे जगविणाऱ्या अशा भगीरथ प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींनी आपली माहिती थोडक्यात ‘लोकमत’च्या शहर कार्यालयात छायाचित्रासह पाठवावी. योग्य त्या माहितीची प्रसिद्धी देण्यात येईल. -संपादक
दुसऱ्याला सावली देण्यासाठी झटणारा ‘किरण’
By admin | Published: June 05, 2017 12:30 AM