कोल्हापूर : लेखक किरण गुरव, डॉ. मेघा पानसरे (कोल्हापूर) आणि डॉ. व्यंकटेश जंबगी (सांगली) यांच्या पुस्तकांची ‘स्वर्गीय यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांसाठी (२०१८) निवड झाली आहे. राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाकडून हे पुरस्कार जाहीर करण्यात आले.यामध्ये प्रौढ वाङ्मय कादंबरी विभागातील ‘हरी नारायण आपटे पुरस्कार’ हा लेखक किरण गुरव यांच्या ‘जुगाड’ या कादंबरीला जाहीर झाला. त्याचे प्रकाशक पुण्यातील दर्या प्रकाशन आहे. मूळ राधानगरी तालुक्यातील असणारे लेखक गुरव हे शिवाजी विद्यापीठातील विशेष कक्षामध्ये अधीक्षकपदी कार्यरत आहेत.
गुरव यांचे आतापर्यंत तीन कथासंग्रह आणि एक कादंबरी प्रकाशित झाली असून, त्यांना लेखनाबद्दल विविध आठ पुरस्कार मिळाले आहेत. प्रौढ वाङ्मय अनुवादित विभागातील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार कोल्हापूरच्या डॉ. मेघा पानसरे यांनी अनुवादित केलेल्या ‘सोविएत रशियन कथा’ या पुस्तकाला जाहीर झाला आहे. त्याचे प्रकाशक मुंबईतील लोकवाङ्मय गृह आहे.
डॉ. पानसरे या शिवाजी विद्यापीठातील विदेशी भाषा विभागाच्या प्रभारी प्रमुखपदी कार्यरत आहेत. त्यांनी रशियन अनुवादित आणि वैचारिक (व्याख्यानमालेतील संपादित) सात पुस्तकांचे लेखन, संपादन केले आहे.
या पुरस्कारांचे स्वरूप एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र असे आहे. बालवाङ्मय नाटक व एकांकिका विभागातील भा. रा. भागवत पुरस्कार डॉ. व्यंकटेश जंबगी यांच्या बालमंच : बाल एकांकिका संग्रहाने पटकावला आहे.
जयसिंगपूरच्या कवितासागर पब्लिशिंग हाऊसने त्याचे प्रकाशन केले आहे. ५० हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. जंबगी हे निवृत्त प्राध्यापक असून, त्यांची आतापर्यंत कविता, लघुकथा, विनोदी कथासंग्रह, आरोग्य आणि व्यक्तिमत्त्व विकासविषयक सहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत.