कोल्हापूर : श्री अंबाबाई देवीच्या मुखापर्यंत किरणे गेली आणि ती सायंकाळी पाच वाजून ४८ मिनिटांनी लुप्त झाली. सोमवारी पाचव्या दिवशी किरणोत्सवाचा वैज्ञानिक अभ्यास करण्यात आला.
गेले चार दिवस मुख्य किरणोत्सव झाला. पुढील उत्तरायणातील मुख्य किरणोत्सव हा पाच दिवसांचा असणार आहे. तो ३० जानेवारी ते तीन फेब्रुवारी २०१९ पर्यंतअसणार असल्याचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले.सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास किरणे महाद्वारपर्यंत आली. त्यानंतर गरुड मंडपात, गणपती मंदिर व पाच वाजून ३७ मिनिटांवेळी चांदीचा उंबऱ्यापर्यंत ही किरणे आली.
यावेळी अंबाबाई मंदिरात भक्तांनी किरणोत्सव पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यासाठी प्रा. डॉ. मिलिंद कारंजकर, शिवाजी विद्यापीठाचे पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पी. डी. राऊत यांनी किरणोत्सवाचा अभ्यास केला. सुमारे ४५ मिनिटे किरणोत्सव सुरू होता.यावेळी महेश जाधव म्हणाले, कोल्हापूर नगरपालिका असताना १९४७ ला किरणोत्सवाचा सर्व्हे झाला होता. त्यावेळी पाच दिवसांचा किरणोत्सव होता, असा अहवाल त्यावेळी प्रशासनाने दिला होता; त्यामुळे पुढील उत्तरायणमधील किरणोत्सव पाच दिवस करण्यास काय हरकत नाही. किरणोत्सवातील अडथळे काढण्यासाठी महापालिकेला सांगणार आहे. यासाठी मंदिर आवारात एल. ई. डी. स्क्रिन लावण्यात येणार आहे. यावेळी सदस्या संगीता खाडे, शीतल माळवी, आदी उपस्थित होते.
असा झाला किरणोत्सव (सोमवार)
वेळ : ठिकाण
सायंकाळी पाच वाजून एक मिनिट महाद्वार
- पाच वाजून १३ मिनिटे गरुड मंडप
- पाच वाजून २५मिनिटे गणपती मंदिर
- पाच वाजून ३७ मिनिटे चांदीचा उंबरा
- पाच वाजून ४२ मिनिटे तिसरी पायरी
- पाच वाजून ४५ मिनिटे चरण स्पर्श
- पाच वाजून ४६ मिनिटे देवीच्या कमरेवरती
- पाच वाजून ४८ मिनिटे देवीच्या मुखापर्यंत