कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा किरणोत्सव उद्या बुधवारपासून सुरू होत आहे. आज मंगळवारी किरणोत्सवाची चाचणी करण्यात येणार आहे. वर्षातून दोन वेळा अंबाबाई मंदिरात हा किरणोत्सवाचा सोहळा होतो.नोव्हेंबर महिन्यातील ९ ते १३ तारखेदरम्यान आणि ३१ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत अंबाबाई मंदिरात किरणोत्सवाचा सोहळा होतो. यात पहिल्या दिवशी मावळतीची सूर्यकिरणे अंबाबाईच्या मूर्तीचा चरणस्पर्श करतात. दुसऱ्यादिवशी कमरेपर्यंत व तिसऱ्या दिवशी चेहऱ्यावर किरणे येतात. चौथ्या व पाचव्या दिवशी किरणांचा परतीचा प्रवास होतो.गेल्या काही वर्षांत मंदिरात अतिशय चांगल्या पद्धतीने किरणोत्सवाचा सोहळा होत आहे. सध्या दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे अंबाबाई दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्याही शहरात वाढली आहे. त्यातच आता किरणोत्सव होत असल्याने हा भाविकांसाठी दुग्धशर्करा योग आहे. यंदाच्या किरणोत्सवात काही अडथळा येत नाही ना हे पाहण्यासाठी आज मंगळवारी चाचणी करण्यात आली.कार्तिक स्वामी दर्शनही बुधवारीदरवर्षी कार्तिक महिन्यात कृतिका नक्षत्राच्या योगावर कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले जाते. आज मंगळवारी चंद्रग्रहण संपल्यानंतर बुधवारी पहाटे ३ वाजून २५ मिनिटांपासून कार्तिक स्वामी दर्शनाचा योग सुरू होत आहे. रात्री ९ वाजून ३८ मिनिटांनी दर्शन बंद होणार आहे.
अंबाबाईचा उद्यापासून किरणोत्सव, मावळतीची सूर्यकिरणे करतात देवीचे चरणस्पर्श
By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2022 7:14 PM