कोल्हापूर : शेतकरी विरोधातील तीन कायदे, प्रस्तावित वीज विधेयक रद्द करावे, या मागणीसाठी २६ मार्चला भारत बंद पुकारण्यात आला असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष उदय नारकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेने या प्रश्नांसोबतच तीन महिन्यांचे वीजबिल तातडीने माफ करावे, या प्रमुख मागणीसाठी भारत बंद यशस्वी करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
नारकर म्हणाले, गेल्या वर्षभरात राज्यातील ग्राहकांवर वीजबिलाचा बोजा पडला आहे. घरगुती वीज ग्राहक आर्थिक विवंचनेमुळे अगोदरच मेटाकुटीला आला आहे. यामध्येच विजेचा अनावश्यक आणि न परवडणारा बोजा सहन करावा लागत आहे. मोदी सरकारने मार्च महिन्यांपासून लॉकडाऊन केला. जूनपर्यंत कडक लॉकडाऊन होता. त्यामुळे जनतेचे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले. यामुळे जनतेला त्याची आर्थिक शिक्षा करणे योग्य नाही. मोदी सरकारने २० लाख कोटींची मदत जाहीर केली होती. यातून वीजग्राहकांना सवलत देणे शक्य आहे. मार्च ते जूनचे वीजबिल संपूर्ण माफ झाले पाहिजे. यासाठी आवश्यक असलेले सहा हजार कोटी रुपयांची मागणी राज्य शासनाने केंद्राकडे केली पाहिजे. केंद्राने मदत केली नाही तर राज्य शासनाने त्याची तरतूद करावी. केरळसह अन्य राज्य जर लॉकडाऊनमधील वीजबिल माफ करू शकतात तर महाराष्ट्र का नाही. या पत्रकार परिषदेला प्रा. डॉ. सुभाष जाधव, अमोल नाईक, आप्पा परीट, संदेश जाधव आदी उपस्थित होते.