कोल्हापूर : महापुरामुळे झालेल्या नुकसानीच्या तुलनेत शासनाकडून झालेली मदत ही तोकडी आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागाची पुन्हा पाहणी करुन पुरग्रस्तांना शंभर टक्के नुकसान भरपाई देण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या ठिकाणी निदर्शने करुन आंदोलकांनी काही काळ ठिय्या मारला.दुपारी एकच्या सुमारास दसरा चौक येथून किसान सभेचे नेते डॉ. उदय नारकर, ‘सिटू’चे नेते प्रा. सुभाष जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातून नागरिक यामध्ये सहभागी झाले होते. घोषणाबाजी करत आंदोलकांचा हा मोर्चा व्हिनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आला. या ठिकाणी निदर्शने करुन आंदोलकांनी ठिय्या मारला. यानंतर शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना सादर करण्यात आले.निवेदनातील मागण्या अशा, जिल्ह्यातील महापूर आणि अतिवृृष्टीने पडझड झालेल्या घरांची पूर्णत: बांधणी व दुरुस्ती शासनामार्फत करावी. पिक नुकसानीचे पंचनामे करुन बागायतीसाठी एकरी एक लाख रुपये तर जिरायतीसाठी एकरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, जिल्ह्यातील महापूर व अतिवृष्टीग्रस्त गावातील शेतमजूर व गरीब शेतकऱ्यांना खावटी अनुदान म्हणून ५० किलो धान्य, ५ किलो तुरडाळ, ५ किलो हरभरा डाळ, ५ किलो साखर, एक गॅस सिलिंडर मोफत द्यावी, महापुराने दगावलेल्या पशुपक्ष्यांसाठी बाजारभावाप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी, कुरुंदवाड येथील बेघर आणि इंगळीसह नियमित बाधित वसाहतींचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करावे, राजापूर-राजापूरवाडीसह वंचित पूरग्रस्त गावांना तात्काळ किसान सन्मान योजनेचा लाभ मिळाला पाहीजे, महापूरात गहाळ किंवा खराब झालेल्या महत्वाच्या कागदपत्रांसाठी गावांमध्ये खास शिबिरे घ्यावीत, शिरोळ तालक्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी योग्य उपाय योजना करावी.आंदोलनात विजयाराणी पाटील, मुमताज हैदर, भाऊसाहेब कसबे, आण्णासो रड्डे, पंकज खोत, सर्वेश सवाखंडे आदींसह पूरग्रस्त सहभागी झाले होते.