कोल्हापूर : केंद्र सरकारच्या शेतीविषयक कायद्याला विरोध करण्यासाठी गेला महिनाभर दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी शनिवारी कोल्हापुरातील शेतकरी दिल्लीकडे रवाना झाले. किसान संघर्ष यात्रेसाठी शंभरहून अधिक शेतकरी रेल्वेने दिल्लीला रवाना झाले आहेत.शेतीविषयक कायद्याला विरोध करण्यासाठी पंजाब, हरियाणातील शेतकरी गेला महिनाभर थंडीत आंदोलन करत आहेत. त्यांना विविध राज्यांतून पाठिंबा मिळत आहे. राज्य किसान सभेनेही या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी किसान संघर्ष यात्रा सुरू केली आहे.
महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थानमार्गे दिल्ली अशी ही यात्रा जाणार आहे. किसान सभेचे राज्य सचिव नामदेव गावडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी दिल्लीकडे रवाना झाले. बार्शी, परभणी, नागपूर, भोपाळ, कोटा, जयपूरमार्गे ७ जानेवारी रोजी ही यात्रा दिल्लीत पोहोचणार असल्याचे गावडे यांनी सांगितले.