आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. 0२ : येथील केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) स्वायत्त समितीने काल (सोमवारी) आणि आज, मंगळवारी भेट देऊन परीक्षण केले. स्वायत्त महाविद्यालयासाठी आवश्यक असणाऱ्या निकष प्राप्त केल्यानंतर केआयटीने युजीसीकडे ‘स्वायत्त’चा दर्जा मिळविण्यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार युजीसीने परीक्षणासाठी संबंधित समिती पाठवून दिली होती.
यामध्ये बिजु पटनाईक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्याम सुंदर पटनाईक, युजीसीचे संयुक्त सचिव डॉ. मंजु सिंघ, नवी दिल्ली आर्किटेक्चर कॉलेजचे डॉ. मनोज माथुर, कोईमतूरमधील पीएसजी कॉलेजचे डॉ. रुद्रमूर्ती, तंत्रशिक्षण संचालनालयाचे संयुक्त सचिव डॉ. दिलीप नंदनवार, वालचंद कॉलेजचे डॉ. गजानन परीशवाड यांचा समावेश होता.
या समितीने सोमवारी प्राचार्यांचे सादरीकरण, विभागांना भेटी, विद्यार्थी, पालक, शिक्षक, माजी विद्यार्थी व उद्योजक आणि महाविद्यालयाच्या व्यवस्थापन यांच्याशी संवाद साधला. केआयटीमध्ये होणारे विविध उपक्रम व गुणवत्ता याबाबत समाधान व्यक्त केले. यासह एनएसएस, क्रीडा, सांस्कृतिक व संशोधनाची दखल घेतली.
दुसऱ्या दिवशी समारोप सभेमध्ये समितीने महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी केआयटीचे अध्यक्ष सचिन मेनन, उपाध्यक्ष भरत पाटील, सचिव साजिद हुदली, विश्वस्त दिलीप जोशी, दिपक चौगुले, सुनील कुलकर्णी, प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी, डॉ. एम. एस. चव्हाण उपस्थित होते. (प्रतिनिधी)