कोल्हापूर : अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) प्रतिष्ठित अशा एआयसीटीई-आयडिया (आयडिया डेव्हलपमेंट इव्हॅल्युएशन अॅप्लिकेशन) प्रयोगशाळा कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अभियांत्रिकी महाविद्यालयात (केआयटी) स्थापन करण्यास मान्यता मिळाली, अशी माहिती केआयटीचे अध्यक्ष भरत पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. देशातील ४९ महाविद्यालयांमध्ये केआयटीची निवड झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पाटील म्हणाले, एआयसीटीई-आयडिया प्रयोगशाळेसाठी देशभरातून सुमारे २०४ प्रस्ताव आले होते. त्यातील १९० प्रस्तावांची पडताळणी झाली. १५० निवडक प्रस्तावांना व्हिडीओ व सादरीकरणासाठी निमंत्रित करण्यात आले होते. अंतिम फेरीत देशभरातील ४९ महाविद्यालयांना ही प्रयोगशाळा मंजूर करण्यात आली. त्यात केआयटीचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या नवनवीन संकल्पनांना व्यासपीठ देण्यासाठी व उद्योगक्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी या प्रयोगशाळेचा उपयोग होणार आहे. प्रयोगशाळा नावीन्यपूर्ण मानसिकता असणा-या विद्यार्थ्यांसाठी सातही दिवस २४ तास खुली राहील. थ्रीडी प्रिंटर, थ्रीडी स्कॅनर, पीसीबी मिलिंग मशिन आणि इतर अनेक यंत्रसामग्री प्रयोगशाळेत असेल.
पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष सुनील कुलकर्णी, सचिव दीपक चौगुले, विश्वस्त सचिन मेनन, विश्वस्त साजिद हुदली, विश्वस्त दिलीप जोशी, विश्वस्त शिल्पजा कनगुटकर, विश्वस्त कर्नल प्रतापसिंह रावराणे, संचालक डॉ. विलास कार्जिन्नी, संशोधन व विकास अधिष्ठाता प्रा. शिवलिंग पिसे, अधिष्ठाता डॉ. पी. पी. पवार, डॉ. एम. एम. मुजुमदार, प्रा. सुभाष माने, प्रा. मिहीर कुलकर्णी आदी उपस्थित होते.
चौकट
३३ उद्योगांची मदत
एआयसीटीई-आयडिया प्रयोगशाळेसाठी सुरुवातीस कमीत कमी ५५ लाखांचा निधी उद्योग जगतातून उभा करणे बंधनकारक होते. पण केआयटीने यापेक्षा अधिक निधी उद्योजकांकडून संकलित केले. निधीसाठी अनेक कंपन्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. जवळपास १ कोटी २० लाख रुपयांचा निधी केआयटीने उभा केला. केआयटी व्यवस्थापनासह एकूण ३३ उद्योगांनी आर्थिक योगदान दिले. यामुळे आता एआयसीटीईकडून ५५ लाखांचा निधी उपलब्ध होणार आहे.
----