कोल्हापूर : सहावा वेतन आयोग लागू करा, आदी मागण्यांसाठी केएमटी कर्मचारी बुधवारी (दि. १९) मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जात आहेत. यापूर्वी प्रशासनाने वारंवार चर्चा करूनही काही मागण्या मान्य केल्यानंतरही त्याची अंमलबजावणी न केल्याबद्दल कर्मचाऱ्यांनी हे बेमुदत संपाचे शस्त्र उपसले आहे. या संपाची नोटीस म्युनिसिपल ट्रान्स्पोर्ट वर्कर्स युनियन या संघटनेच्यावतीने प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांना दिलेली आहे. केएमटीकडील सर्व कर्मचाऱ्यांना सहावा वेतन लागू करावा, आदी मागण्यांबाबत कर्मचाऱ्यांनी हा संपाचा इशारा दिला आहे. २५ मे २०१६ रोजीही संपाची नोटीस दिली होती; पण त्यासंबंधी महापौर, आयुक्त आणि पदाधिकारी यांच्याशी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली. त्यावेळी दि. ८ व २० जुलै २०१६ रोजी वाटाघाटी करून काही मागण्या मान्य केल्या होत्या. तसेच राज्यातील अन्य परिवहन शहरी प्रवासी संस्थांकडून सहावा वेतनबाबतची माहिती घेऊन पुन्हा एक महिन्यानंतर सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार प्रशासनाकडून दि. १९ आॅगस्ट रोजी चर्चेस बोलविले नाही. बुधवारी दिवसभर प्रशासनाने चर्चेसाठी बोलविले नाही तर केएमटीचे सर्व कर्मचारी बुधवारीच मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही या संघटनेचे अध्यक्ष निशिकांत सरनाईक यांनी बजावलेल्या नोटिसीत म्हटले आहे. अशा आहेत मागण्या... ४केएमटीकडील सर्व कर्मचाऱ्यांना सहावा वेतन लागू करावा, वेळेवर पगार करावा ४एल.आय.सी., प्रॉव्हिडंट फंड, विमा, व्यवसाय कर, आदी पगारातून कपात करून घेतलेल्या रकमा पूर्ववत भरणा कराव्यात ४रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करावे, वर्कशॉपमधील फिटर कर्मचाऱ्यांना फरकाची रक्कम द्यावी ४अल्पबचतीची खाती बंद केल्याने ज्या कर्मचाऱ्यांची अल्पबचतीची रक्कम पगारातून कपात केली आहे ती त्या-त्या कर्मचाऱ्यांना परत करावी ४‘सी’ बॅचमधील कर्मचाऱ्यांना ‘ए’ बॅचमध्ये घ्यावे.
केएमटी कर्मचारी बुधवारपासून संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2016 1:05 AM