कोल्हापूर : आर्थिक संकटात सापडलेल्या कोल्हापूर महानगरपालिका परिवहन विभागास (केएमटी) कोरोना विषाणूमुळे जबरदस्त आर्थिक फटका बसत आहे.
प्रवाशांची रोडावलेली संख्या विचारात घेता, प्रशासनाने केवळ ४० बसेस मार्गांवर सोडल्या; त्यामुळे ‘केएमटी’ला एका दिवसात तब्बल साडेपाच लाखांचा फटका बसला. उद्या, रविवारी ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन पंतप्रधानांनी केले असल्यामुळे या दिवशी ‘केएमटी’ची एकही बस रस्त्यांवर धावणार नाही, असे सांगण्यात आले.कोरोना विषाणूच्या संसर्गाची भीती असल्यामुळे सर्वच क्षेत्रांवर मोठे परिणाम होत आहेत. गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ शहर व आसपासच्या प्रवाशांची सेवा करणाऱ्या केएमटी बससेवेवरही या संसर्गाचा परिणाम होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात शाळा, महाविद्यालये बंद आहेत.
व्यवसायांमध्ये मंदी आहे. त्यामुळे प्रवाशी संख्या रोडावली आहे. शहरात रोज १०१ बसेस धावतात. शुक्रवारी तर त्यांतील ६१ बसेस बंद ठेवाव्या लागल्या. केवळ ४० बसेस रस्त्यांवर धावत होत्या. त्यातून केवळ तीन लाखांचे उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा आहे.
रोज आठ ते साडेआठ लाखांचे उत्पन्न मिळत असते; परंतु या उत्पन्नात बरीच घट झाली आहे. प्रवासी संख्याही २५ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे.बसची संख्या कमी केल्यामुळे रोजंदारी व कंत्राटी पद्धतीने घेतलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे काम थांबविण्यात आले आहे. केवळ कायम सेवेतील कर्मचाºयांनाच ड्यूटी दिली जात आहे. सध्या ग्रामीण भागातील सर्व मार्गांवरील बसेस बंद ठेवल्या आहेत. बसेस रोज फिनेल आणि डेटॉलने धुऊन त्यांचे निर्जंतुकीकरण केले जात असल्याचेही सूत्रांनी सांगितले.