कोल्हापूर : केएमटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत प्रशासन सकारात्मक असताना तसेच बहुतांशी मागण्या मान्य झाल्या असतानाही बेमुदत संप पुकारणाऱ्या म्युनिसिपल वर्कर्स युनियन (इंटक) च्या पदाधिकाऱ्यांनी तीन दिवसांनंतर रविवारी सायंकाळी संप मागे घेतला. मात्र, रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याच्या तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना रोजंदारी म्हणून घेण्याच्या मागणीबाबत ठोस निर्णय झाला नसताना संप का मागे घेत आहात, अशी विचारणा करीत काही कर्मचाऱ्यांनी युनियनच्या पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले.कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयाेगाची अंमलबजावणी करावी, रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करावे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना रोजंदारी म्हणून घ्यावे, २३ टक्के महागाई मिळावी अशा प्रमुख मागण्यांसाठी केएमटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संप सुरू केला होता. शुक्रवारी तसेच शनिवारी अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, सहायक आयुक्त संजय सरनाईक यांनी कर्मचारी संघटना प्रतिनिधीबाबत चर्चा करून केएमटीची सध्याची आर्थिक स्थिती, प्रशासन करीत असलेले प्रयत्न याबाबत समजूत काढत होते. परंतु, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ऐकले नाही. प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनीही त्यांच्याशी चर्चा केली. शनिवारपर्यंत ते अडून राहिले.रविवारी सायंकाळी पुन्हा अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी त्यांच्याशी चर्चा केली. सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यास तसेच रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्यास शासनाची परवानगी आणण्यासाठी मी स्वत: आपल्या बरोबरीने पुढाकार घेत असल्याचे जाधव यांनी चर्चेवेळी सांगितले. त्यानंतर संघटना पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून संप मागे घेत असल्याचे सांगितले. या चर्चेवेळी निशिकांत सरनाईक, जितेंद्र संकपाळ, अंकुश कांबळे, किरण सावर्डेकर, अमर पाटील उपस्थित होते.दरम्यान, चर्चेतील तपशील कर्मचाऱ्यांना सांगण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी बुद्धगार्डन डेपोत गेले. कर्मचाऱ्यांनी मात्र संप मागे घेण्यास विरोध केला. आपण ठोस कृती होत नाही, तोपर्यंत संप मागे घ्यायचा नाही असे ठरले होते, असे सांगत संघटना पदाधिकाऱ्यांशी वाद घातला. बराच वेळ वादावादी सुरू होती; पण संप मागे घेत असल्याचे सांगत पदाधिकाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला.
संप का केला?या संपाबाबत कर्मचाऱ्यांतूनच उलटसुलट चर्चा सुरू होती. कर्मचारी सोसायटीची निवडणूक जवळ आली असल्याने या निवडणुकीत फायदा करून घ्यायचा असेल तर संप करणे आवश्यक वाटल्याने हा संप पुकारण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. संप करण्याची ही वेळ नव्हती, संप केल्यानंतर तो मागे का घेतला, अशी विचारणा कर्मचारी करताना दिसत होते.
नुकसानीला जबाबदार कोण?केएमटीची बससेवा तीन दिवस बंद राहिल्याने जवळपास २० ते २२ लाखांचे नुकसान झाले. या नुकसानीला जबाबदार कोण? संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांची बिनपगारी रजा मांडली जाणार का? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.