कोल्हापूर : आयुष्यातील २५ ते ३0 वर्षे संस्थेसाठी प्रामाणिकपणे काम करायचे आणि उतारवयात दुसऱ्यावर अवलंबून राहायचे, अशी स्थिती केएमटीमधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची झाली आहे. कामावर असताना दर महिन्याच्या पगारासाठी प्रशासनाच्या पायऱ्या झिजविल्या. सेवानिवृत्तीनंतर पेन्शनसाठीही त्यांच्या पदरी संघर्ष आला आहे.महापालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शनसाठी दर महिन्याला १0 तारखेची प्रतीक्षा करावी लागते. येथील कर्मचाऱ्यांना समाधानकारक पेन्शन आहे; मात्र केएमटी कर्मचाऱ्यांची वाईट स्थिती आहे. केवळ ८00 ते २५00 रुपये पेन्शनवरच त्यांना उदरनिर्वाह करावा लागत आहे. ही पेन्शन सुरू होण्यासाठी दोन ते तीन वर्षे प्रतीक्षा करावी लागते. तसेच संबंधितांचे हात ओले केल्याशिवाय पेन्शनची फाईल पुढे सरकत नाही.कोल्हापूर महापालिकेतील कर्मचाऱ्यांची पेन्शन वेळेवर होत नाही. याबद्दल सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेने तत्कालीन आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांची भेट घेतली. त्यांनी १ तारखेलाच पेन्शन देण्याचे आदेश दिले होते. काही महिने १ तारखेला पेन्शनही झाली. त्यांची बदली झाल्यानंतर काही महिन्यांतच हा नियम कागदावरच राहिला.
महापालिकेची आर्थिक स्थिती बेताची असल्याने पेन्शन वेळेवर होत नाही. १0 तारखेपर्यंत प्रतीक्षा करण्याची वेळ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर येत आहे. वास्तविक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना औषध उपचारासाठी पैशाची गरज असते. दुसऱ्यांकडे पैसे मागण्याची वेळ आता त्यांच्यावर आली आहे; त्यामुळे पूर्वीप्रमाणे १ तारखेलाच पेन्शन मिळावी, अशी मागणी जोर धरत आहे.केएमटी कर्मचाऱ्यांना तुटपुंजी पेन्शनकेएमटीच्या कर्मचाऱ्यांचा त्रास सेवानिवृत्तीनंतरही संपत नाही, अशी स्थिती आहे. कामावर असताना वेळेवर पगार नसल्यामुळे सावकाराच्या दारात जाण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे, तर सेवानिवृत्तीनंतर ८00 ते २५00 रु. पेन्शन मिळते. तुटपुंज्या पेन्शनमुळे दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची नामुष्की त्यांच्यावर आली आहे. वास्तविक पगाराएवढी पेन्शन देण्याचा निर्णय झाला असताना याची अंमलबजावणी होत नाही. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर उतारवयातही संघर्ष सुटलेला नाही.
- महापालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी- सुमारे ३000
- केएमटी- एक हजार
- केएमटी कर्मचाऱ्यांना पेन्शन-८00 ते २५00 रु.
पगाराएवढी पेन्शन मिळाली पाहिजे
केएमटी कर्मचाऱ्यांना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच पेन्शन मिळाली पाहिजे. पेन्शन वाढीचा प्रस्ताव केंद्रीय पातळीवर मंजूर होऊनही अंमलबजावणी होत नाही. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्वरित पेन्शन सुरू होत नाही. तीन वर्षांनंतर पेन्शन सुरू झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. पगाराएवढी पेन्शन मिळालीच पाहिजे.सुभाष सावंत, केएमटी सेवानिवृत्त कर्मचारी