कोल्हापूर , दि. ३ : पापाची तिकटी ते गंगावेश या वर्दळीच्या रस्त्यावर रविवारी रात्री झालेल्या केएमटी बस अपघातानंतर बंद ठेवण्यात आलेली बस सेवा मंगळवारी पूर्ववत सुरु करण्यात आली. मात्र राजारामपुरी व कागल मार्गावरुन धावणाºया १४ बसेस अद्याप बंद ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, दगडफेक, तोडफोडीमुळे दोन बसेस व अग्निशमन दलाच्या तीन वाहनांचे मिळून सुमारे दोन लाख रुपयांचे तर बससेवा बंद ठेवल्यामुळे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे केएमटी सुत्रांनी सांगितले.
रविवारी रात्री साडेसात वाजता अपघात घडल्यानंतर जमावाकडून झालेली तोडफोड व दगडफेक पाहून केएमटी प्रशासनाला तात्काळ सर्व मार्गावरील बस सेवा बंद ठेवावी लागली. सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास प्रशासनाने बस सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या पाच बसेस बाहेर काढण्यात आल्यानंतर त्या पुन्हा काही तरुणांनी रस्त्यावर अडविल्या. त्यामुळे सोमवारी दिवसभरही बस सेवा बंद ठेवावी लागली.
मंगळवारी मात्र प्रशासनाने पहाटे पाच वाजल्यापासून बस सेवा पूर्ववत सुरु ठेवली. सुमारे ९७ बसेस मार्गावर सोडण्यात आल्या. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून राजारामपुरी मार्गावरील ८ तसेच कागल मार्गावरील ६ अशा एकूण १४ बसेस मंगळवारीही बंद ठेवल्या.
मंगळवारी बस सेवा सुरु झाल्यानंतर सकाळी अपघातातील जखमी आनंदा राऊत यांचे निधन झाल्याची बातमी बाहेर आली. त्यामुळे केएमटी प्रशासनाने अंत्ययात्रा जाणाºया मार्गावर एकही बस जाणार नाही याची खबरदारी घेतली. तोडफोड तसेच बससेवा बंद ठेवल्यामुळे केएमटी प्रशासनाला बारा लाखाचे नुकसान सहन करावे लागले.
आयुष्यमान संपले तरी गाड्या तंदुरुस्त---------------------------केएमटीच्या ताफ्यात २००७ साली घेण्यात आलेल्या बसेस पैकी आरटीओच्या नियमाप्रमाणे ३९ बसेसचे आयुष्यमान संपले आहे. तरीही या सर्व बसेस रस्त्यावरुन धावण्याइतक्या परिपूर्ण, तंदुरुस्त असल्याचा दावा केएमटीच्या काही अधिकाºयांकडून केला जातो. ३९ बसेस प्रत्येक वर्षी आरटीओ पासिंग केले जाते. त्यानंतरच या बसेस प्रवासी वाहतुकीसाठी रस्त्यावर सोडल्या जातात. ज्या बसचा अपघात झाला त्या बसचे पासिंग तर आॅगस्ट २०१७ मध्ये झाले आहे. सर्वच बसेसची देखभाल दुरुस्ती नियमित केली जाते. चालकांकडून कोणत्याही गंभीर स्वरुपाच्या तक्रारी या बस बाबत नव्हत्या,असे लॉगबुकवरील नोंदीवरुन समोर आले आहे. सोमवारी सर्व लॉगबुकवरील नोंदी तपासण्यात आल्या. त्यातून ही माहिती पुढे आली.मिरवणुक मार्ग का बंद केला नाही?------------------------प्रत्येक वर्षी मोहरमची मिरवणुक शिवाजी पुतळ्याजवळील घुडणपीर दर्गा येथून सुरु होते. पुढे ही मिरवणुक महानगरपालिका, पानलाईन, पापाची तिकटी, गंगावेश, पंचगंगा रोड या मार्गावरुन जाते. कायमस्वरुपी हाच मार्ग आहे. ज्या वेळी मिरवणुक सुरु होते, त्यावेळी पोलिस प्रशासनाकडून या मार्गावरील वाहतुक बंद ठेवली जाते. परंतु रविवारी या मार्गावरील वाहतुक का बंद ठेवली नाही? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. जर वाहतुक बंद ठेवली असती तर कदाचित ही घटनाच घडली नसती असे केएमटी चालकांनीच सांगितले.