कोल्हापूर : केएमटी कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर २०१९ चे थकीत वेतन चार टप्प्यांत देण्यात येणार आहे. यासाठी ६० लाखांच्या रकमेची तरतूद केली जाणार असल्याची माहिती सोमवारी महापौर निलोफर आजरेकर यांनी दिली. याचबरोबर कोरोनामुळे कपात केलेला २५ टक्के पगारही टप्प्याटप्प्याने देण्याचाही निर्णय झाला.कामगार कर्मचारी संघर्ष युनियन आणि केएमटीतील प्रमोद पाटील यांची कर्मचारी युनियनच्यावतीने रविवारी केएमटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसदर्भात पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेतली होती. त्यांनी महापालिका पदाधिकाऱ्यांना बैठक घेण्याचे आदेश दिले होते. यानुसार ही बैठक झाली.संजय पाटील म्हणाले, सप्टेंबर २०१९ चा पगार थकीत असून कोरोनामुळे मार्च महिन्यांचा ७५ टक्के पगार दिला आहे. मे महिन्याचाही पगार कमी करण्यात येत आहे. मुलांचे शिक्षण, कर्जाचे हप्ते, आदी खर्च करणे कठीण झाले आहे. त्यामुळे शंभर टक्के पगार द्यावा. गेल्या ३० वर्षापासून रोजंदारीवर काम करणारे कर्मचारी असून सध्या त्यांचे काम बंद आहे. या वयात ते दुसरे काम करू शकत नाहीत. त्यामुळे रोजंदारीवरील ३०० कर्मचाऱ्यांना महापालिकेत सामाविष्ट करून घ्या.प्रमोद पाटील म्हणाले, केएमटीचे कर्मचारीही मनपा कर्मचाऱ्यांप्रमाणेच कोरोनामध्ये जीव धोक्यात घालून काम करत आहेत. त्यांनाही १०० टक्के पगार मिळावा. रोजंदारी कर्मचाऱ्यांना पाणीपुरवठा, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम विभागात गरजेनुसार काम द्यावे. महापालिकेतील इतर कर्मचाऱ्यांना १६५ टक्के महागाई भत्ता, परंतु केएमटी कर्मचाऱ्यांना १२५ टक्के आहे, असा दुजाभाव का? पाच टक्के घरभाडे भत्ता अजूनपर्यंत बाकी आहे.परिवहन समिती सभापती प्रतिज्ञा निल्ले, गटनेते शारंगधर देशमुख यांनी कोरोनाचे संकट असून केएमटीचे उत्पन्न शून्य आहे. अशा स्थितीमध्ये घरात बसून ७५ टक्के पगार दिला जात आहे. २५ टक्के पगार कपात नसून कोरोना संकट टळल्यानंतर देण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी उपमहापौर संजय मोहिते, महेश उत्तुरे, नगरसेवक अशोक जाधव, सहायक आयुक्त चेतन कोंडे, मुख्यलेखापाल संजय सरनाईक, इर्शाद नायकवडी, मनोज नार्वेकर, नितीन पाटील उपस्थित होते.ठेकेदाराऐवजी केएमटी कर्मचारी घ्यामहापालिकेच्या वाहनांवर चालक पदासाठी खासगी कंपनीला ठेका दिला आहे. त्यांना १४ हजार पगार दिला जातो. याचबरोबर टिपरवरही ११५ कर्मचारी खासगीकरणातून घेण्यात येणार आहेत. याठिकाणी ठेकेदाराऐवजी केएमटीच्या रोजंदारीवरील कर्मचाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी संजय पाटील, प्रमोद पाटील यांनी केली.
केएमटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन चार टप्प्पांत देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 3:27 PM
केएमटी कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर २०१९ चे थकीत वेतन चार टप्प्यांत देण्यात येणार आहे. यासाठी ६० लाखांच्या रकमेची तरतूद केली जाणार असल्याची माहिती सोमवारी महापौर निलोफर आजरेकर यांनी दिली. याचबरोबर कोरोनामुळे कपात केलेला २५ टक्के पगारही टप्प्याटप्प्याने देण्याचाही निर्णय झाला.
ठळक मुद्देकोरोनानंतरच १०० टक्के वेतन महापालिका पदाधिकारी-कामगार युनियनच्या बैठकीत निर्णय