कोल्हापूर : केएमटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर कामगार संघर्ष युनियन आणि मान्यताप्राप्त संघटनेने पुकारलेले चक्का जाम आंदोलन तात्पुरते स्थगित केले. केएमटी प्रशासनाला दिलेल्या निवेदनातील बहुतांश मागण्या मान्य झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे संजय पाटील व प्रमोद पाटील यांनी म्हटले आहे.
कर्मचारी संघर्ष युनियन तसेच केएमटी मान्यताप्राप्त संघटनेने कर्मचाऱ्यांचा पगार, कोरोना विमा कवच व थकीत पगारासंबंधी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यावर उपायुक्त निखिल मोरे व संघटना प्रदेशाध्यक्ष संजय पाटील यांच्यात झालेल्या चर्चेनुसार व संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पाटील व पदाधिकारी यांनी व्यवस्थापक यांच्याशी वेळोवेळी केलेल्या चर्चांनुसार मागण्या मान्य झाल्याचे म्हटले आहे.माहे जुलैच्या पगाराबरोबरच एक-दोन दिवसांत थकीत २०१९ च्या पगारापोटी १५ लाख रुपये पहिला हप्ता महापालिका प्रशासन भरणार आहे; त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या खात्यावर एकूण ९० टक्के पगार जमा होणार आहे. केएमटी कर्मचारी कोरोना महामारीत जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. त्यांना सुरक्षा नव्हती. मागणीनुसार सुरक्षा कवच मान्य झाले.जिल्ह्याधिकारी कार्यालयात केएमटीच्या थकीत असलेल्या दोन कोटी रुपये बसभाड्यासाठी पाठपुरावा करण्याचे ठरले. त्यातील पैसे मागील २५ टक्के कपातीपोटी देण्याचे मान्य केलेले आहे. यावेळी संजय पाटील, प्रमोद पाटील, इर्शाद नाईकवाडी, रवी इंगवले, नितीन पाटील, मारुती पाटील, मानसिंग जाधव, अमर पाटील, तानाजी मेंगाणे, रंजित पाटील, संजू पाटील उपस्थित होते.