कोल्हापूर : आर्थिकदृष्ट्या डबघाईला आल्यामुळे आधीच तोट्यात चाललेल्या के.एम.टी.चे भवितव्य आता अधिकच अंधारात सापडले आहे. ‘बुडत्याचा पाय खोलात’ अशी अवस्था झालेल्या के.एम.टी.चे सुमारे एक हजार कर्मचारी आज, गुरुवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. सध्याचा पगार भागविण्यासाठी प्रशासनास मारामार करावी लागत असताना कर्मचारी सहावा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीवर ठाम राहिल्याने हा संप सुरू राहिला. के.एम.टी. वर्कर्स युनियन (इंटक) या संघटनेने कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात दि. ५ आॅक्टोबरला आयुक्त पी. शिवशंकर यांना निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी झालेल्या बैठकीत बहुतांशी मागण्यांवर सकारात्मक चर्चा होऊन मागण्या मान्य करण्यात आल्या. तथापि, सहावा वेतन आयोग लागू करण्यासारखी सध्याची परिस्थिती नसल्याने तो दिला जाऊ शकणार नाही, कर्मचाऱ्यांनी त्या मागणीवर अडून बसू नये, अशी आग्रही विनंती आयुक्तांनी केली होती, परंतु कर्मचाऱ्यांनी ही विनंती धुडकावून लावली. गुरुवारपासून ‘बेमुदत संप’ होणार असल्याने बुधवारी प्रशासनाकडून पुन्हा चर्चेला बोलाविले जाईल, याच्या प्रतीक्षेत असलेले कर्मचारी संघटनेच्या नेत्यांनी प्रशासनाच्या निरोपाची वाट पाहिली; पण सायंकाळी साडेसहा वाजले तरी कसलाही निरोप मिळाला नाही. त्यामुळे शाहू क्लॉथ मार्केट येथील के.एम.टी.च्या प्रधान कार्यालयासमोर जमलेल्या कर्मचाऱ्यांनी निदर्शने करण्यास सुरुवात केली; तेथे छोटी सभा झाली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष निशिकांत सरनाईक, राजेंद्र तिवले यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला, आणि त्यांची मते आजमावून घेतली. सायंकाळी सात वाजता ‘बेमुदत संपा’वर जाण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी प्रमोद पाटील, विश्वनाथ चौगुले, मनोज नोर्वेकर, बापू भोसले, अमर पाटील, के. व्ही. जाधव, डी. एस. माळी, आदी उपस्थित होते. आयुक्त पी. शिवशंकर बुधवारी कोल्हापुरात नव्हते. त्यामुळे कर्मचारी संघटनेशी कोणी अधिकाऱ्यांनी चर्चा केली नाही. उलट प्रभारी अतिरिक्त वाहतूक व्यवस्थापक संजय भोसले यांनी कर्मचारी संघटनेला पत्र देऊन संप करू नये, असे आवाहन केले. के.एम.टी.ची आर्थिक स्थिती अतिशय बिकट असल्याने संप परवडणारा नाही, तसेच सध्या शालेय स्तरावर परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होणार असल्याने संप करू नका, असे कळविले. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही. या बेमुदत संपात वाहतूक शाखेकडील सर्व चालक, वाहक, आस्थापना विभाग, यंत्रशाळा अशा तीन विभागांतील सुमारे एक हजार कर्मचारी सहभागी होत आहेत. रात्री सर्व बसेस बुद्ध गार्डन येथील यंत्रशाळेत ( हॅलो ३ वर) ३४ लाखांचा अतिरिक्त बोजाके.एम.टी.च्या सुमारे एक हजार कर्मचाऱ्यांच्या पगारावर प्रत्येक महिन्याला १ कोटी ३६ लाख रुपये खर्च करावे लागत आहेत, जर कर्मचाऱ्यांनी मागणी केल्याप्रमाणे सहावा वेतन आयोग लागू करायचा म्हटले तर प्रत्येक महिन्याला हा खर्च ३४ लाखांनी वाढणार आहे. सध्याच्या घडीला इतक्या रकमेचा बोजा सहन करणे के.एम.टी.ला शक्य होणार नाही. आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्यामुळे कर्मचाऱ्यांचे प्रत्येक महिन्याला पगार होत नाहीत. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांची मागणी मान्य केली, तर परिस्थिती अधिकच बिकट होईल.५के.एम.टी.ची स्थिती बिकट असल्याने सहाव्या वेतन आयोगाची मागणी मान्य करणे अशक्य आहे. जर संप केला तर परिस्थिती अधिकच बिकट होऊन आर्थिक संकट गडद होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी वास्तव परिस्थितीचे भान ठेऊन संपासारखा प्रसंग टाळावा. - संजय भोसले, अतिरिक्त वाहतूक व्यवस्थापक
केएमटीचा बेमुदत संप सुरू
By admin | Published: October 20, 2016 1:05 AM