कोल्हापूर : येथील त्र्यंबोली यात्रेतील मटणाच्या वाट्यातील मुंडी घेण्यावरून झालेल्या वादावादीतून सईद अन्वर सलीम नायकवडी शानेदिवाण (वय २९,रा. म्हाडा कॉलनी हॉकी स्टेडियम) यांच्यावर चाकू हल्ला केल्याप्रकरणी दोघांविरोधात जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल झाला. निहाल हजारे (पूर्ण नाव समजले नाही), गोट्या परब ( रा. बालाजी पार्क) अशी आरोपींची नावे आहेत. ही घटना शुक्रवारी सकाळी हॉकी स्टेडियमजवळ घडली.पोलिसांनी सांगितले की, त्र्यंबोली यात्रेनिमित्त बकरी कापून वाटे देण्याचे काम हॉकी स्टेडियम बालाजी पार्क येथे शुक्रवारी पहाटे सुरू होते. सईद हे पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हॉकी स्टेडियम येथे मटणाच्या वाट्याची वाट पहात असताना त्यांना एका मित्राने फोन करून ओंकार शिंदे व गोट्या परब यांच्यात मुंडीचा वाटा पाहिजे असल्याच्या कारणातून जोरदार वादावादी सुरू असल्याचे सांगितले. त्यामुळे सईद हे तत्काळ वाद सुरू असल्याच्या ठिकाणी गेले. त्यांने मध्यस्थी करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. परंतु गोट्या परब हा काही केल्या ऐकायला तयार नव्हता. तो सकाळी सात वाजण्याच्या सुमारास निहाल हजारे व अन्य १० ते १२ जणांसोबत पुन्हा म्हाडा कॉलनी येथील सईदच्या घराजवळ गेला. ओंकार कोठे आहे म्हणून पुन्हा शिवीगाळ करू लागला. सईद व त्याचा मित्र राहुल लोहार हे पुन्हा वाद सोडविण्याचा प्रयत्न करताना गोट्या परब व निहाल हजारे हे राहुल लोहारच्या अंगावर गेले. त्याला सोडवत असतानाच या दोघांनीही सईदवर चाकू हल्ला केला. या हल्यात सईद हे जखमी झाले.
कोल्हापुरात त्र्यंबोली यात्रेतील वाट्यावरून चाकू हल्ला, दोघांविरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 12:49 PM