लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : वाहतूक नियमांची माहिती असूनही अनेकजण कळतंय, पण वळत नाही, अशा पद्धतीने वागतात. सर्वांनी नियमांचे पालन केले तर अपघातांचे प्रमाण निश्चितपणे कमी होईल, असे प्रतिपादन अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी केले.
येथील शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने गुरुवारी ३२ व्या रस्ता सुरक्षा अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक गायकवाड बोलत होत्या. त्या म्हणाल्या, मुले ज्याप्रमाणे आई-वडिलांकडे काही गोष्टींसाठी हट्ट धरतात, त्याचप्रमाणे आई-वडील वाहन चालवताना त्यांना वाहतूक नियमांच्या पालनासाठीही हट्ट करावा, असे आवाहन केले. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
पोलीस उपअधिक्षक बी. बी. महामुनी, परिवहन निरीक्षक बालाजी धनवे, नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक पाेलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात वाहतूक नियमाबाबत प्रबोधन करणे, माहिती पत्रकांचे वाटप करणे, शाळा व महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती देणे, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धांचे आयोजन, चौकामध्ये सूचना फलकांचे अनावरण, घोषवाक्य स्पर्धा, वाहनांना रिप्लेक्टर लावणे आदी विविध कार्यक्रम घेणार असल्याचे सांगितले. इचलकरंजी पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी आभार मानले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक गायकवाड यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रबोधन रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, वाहतूक सल्लागार समितीचे सदस्य, शहरातील एनसीसी व आरएसएसचे विद्यार्थी, शिक्षक, नागरिक उपस्थित होते. मोनिका जाजू यांनी सूत्रसंचालन केले.
(फोटो ओळी)
इचलकरंजीत वाहतूक प्रबोधन रॅलीचा प्रारंभ अतिरिक्त पोलीस अधीक्षक गायकवाड यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष अलका स्वामी, तानाजी पोवार, वाहतूक सल्लागार समितीचे सदस्य, शहरातील एनसीसी व आरएसएसचे विद्यार्थी, शिक्षक, नागरिक उपस्थित होते.