बाबासो हळिज्वाळेकोगनोळी : कर्नाटकातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला असून दुसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. कोगनोळी ग्रामपंचायतीसाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये रविवार दिनांक 27 रोजी मतदान होत आहे. उमेदवारांनी वॉर्डनिहाय बैठकांबरोबरच मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर दिला आहे.कोगनोळी ग्रामपंचायतीसाठी कॉंग्रेसप्रणीत माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील ग्राम विकास आघाडी व भाजपप्रणीत परिवर्तन आघाडी यांच्यामध्ये लढत होणार आहे. आज पर्यंत ग्रामपंचायतीवर ग्रामविकास आघाडीची एकहाती सत्ता आहे. त्यांनी गावांमध्ये राबवलेल्या अनेक विकास कामांच्या जोरावर मतदारांना आवाहन करण्यास सुरुवात केली आहे.
भाजपप्रणित परिवर्तन आघाडी महिला व बालकल्याण मंत्री नामदार शशिकला जोल्ले यांनी गावाच्या विकासासाठी दिलेल्या निधीच्या जोरावर मतदारांपर्यंत यशस्वीपणे पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे.
यामध्ये परिवर्तन आघाडीला एसटी प्रवर्गाचा उमेदवार न मिळाल्याने ग्रामविकास आघाडीच्या एसटी उमेदवार मंगल शिवाजी नाईक यांची निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी टी टी नाडकर्णी यांनी यापूर्वीच घोषित केले आहे. या बिनविरोध निवडीमुळे निवडणुकीमध्ये ग्राम विकास आघाडीने आपले खाते उघडले आहे. शुक्रवार दिनांक 25 रोजी सायंकाळी पाच वाजता प्रचार तोफा थंड होतील.परिवर्तन आघाडीचे उमेदवार नितीन कानडे व रेणुका कानडे हे अनुक्रमे वार्ड क्रमांक आठ व दोन मधून प्रजावानी फाऊंडेशन ही सामाजिक संघटना व भाजप यांच्या परिवर्तन आघाडीमधून निवडणूक लढवीत आहेत. त्यांनी निवडणुकीतून माघार घेऊन ग्राम विकास आघाडी ला जाहीर पाठिंबा देत असल्याचे काल माध्यम प्रतिनिधींसमोर घोषित केले.