कोल्हापूर : प्रदीप जगताप हे मंगळवारी दुपारी माझ्या घरी आले. चर्चा केली. कोकम प्याले व निघून गेले. त्याचे सीसीटीव्हीमध्ये चित्रीकरणही उपलब्ध आहे; परंतु त्यांनी सायंकाळी मात्र मला शिवीगाळ केल्याचा खोटा गुन्हा पोलिसांत नोंदवला असल्याने त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते राजू लाटकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
ते म्हणाले, जगताप यांनी माझा मोठा भाऊ शैलश लाटकर यांच्यासोबतच्या संगणकाच्या व्यवहारातून वादातून मी व भावाने शिवीगाळ करून मारहाण केल्याची खोटी तक्रार पोलिसांत केली आहे. मी व माझा भाऊ यांचा एकत्र व्यवसाय नाही व वास्तव्यही नाही. त्यांच्यातील कोणत्याही व्यवहाराबद्दल मला काहीच माहिती नाही. मी व पत्नी सध्या कोरोना झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच विश्रांती घेत आहोत. जगताप व माणगावे हे माझ्या घरी आले. संगणक व्यवहारातून मार्ग काढण्याची विनंती केली. व्यवहाराची माहिती घेऊन आठ-दहा दिवसांतून बोलतो असे सांगितले. घरी भेटायला आलेत म्हणून कोकम दिला आणि त्यांनी मात्र घरी येण्याचे रेकॉर्ड करून खोटी तक्रार केली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे जाणीवपूर्वक रचलेले षड्यंत्र आहे. म्हणून जगताप यांच्यावर खोटी तक्रार केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.