कोल्हापूर : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या खुन्यांच्या तपासासाठी कोकणातील पोलीस अधिकारी गुरुवारी रात्री उशिरा कोल्हापुरात आले. त्यामध्ये रत्नागिरी, चिपळूण, रायगड या ठिकाणच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यातील काही अधिकाऱ्यांनी यापूर्वी कोल्हापुरात काम केले आहे.गत महिन्यात गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी उमा यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. या गोळीबारामध्ये गोविंद पानसरे यांचा मृत्यू झाला. त्यामुळे खुन्यांना शोधण्यासाठी स्थानिक पोलिसांच्या पथकासह राज्यातील दहशतवादीविरोधी पथक (एटीएस)तसेच विविध पथके कार्यरत आहेत. अद्यापही या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. दरम्यान, यापूर्वी कोल्हापुरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, गुन्हे शोधपथक (डी.बी.) तसेच खास पथकात विशेष काम केलेल्या अधिकाऱ्यांची बदली कोकणात झाली आहे. पानसरे खूनप्रकरणाच्या तपासासाठी अशा अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा याठिकाणी बोलावून घेण्यात आले आहे. गुरुवारी (दि.१९) रात्री कोकणातील पोलीस कोल्हापुरात दाखल झाले. त्यांनी स्थानिक पोलिसांकडून पानसरे यांच्या खुनाची सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर हे पोलीस शुक्रवारी सकाळी सागरमाळ येथे माहिती घेण्यासाठी गेले होते. मात्र, पोलिसांनी ही माहिती गोपनीय ठेवली आहे. त्यामुळे याबाबतचा तपशील समजू शकला नाही.
कोकणातील पोलीस कोल्हापुरात
By admin | Published: March 20, 2015 11:31 PM