कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या मालाच्या वाढत्या किमती आणि विनिमय दरामुळे पेट्रोल व डिझेलचा दरांत प्रचंड वाढ होत आहे. याचा परिणाम सर्वच घटकांवर होत आहे.गेल्या सहा महिन्यांत कोल्हापुरातील पेट्रोलचा दर तब्बल सात रुपये ३० पैसे व डिझेलचा नऊ रुपये ३० पैसे इतका वाढला आहे. मंगळवारी पेट्रोलचा दर ८६ रुपये ८२ पैसे, ७४ रुपये ७३ पैसे इतका होता. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशांचे बजेट कोलमडले आहे.
तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या दरावरही परिणाम झाला आहे. सततच्या इंधन दरवाढीमुळे केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकारवर ‘पेट्रोलच्या शतकासाठी १३ धावा कमी; सात षटके बाकी; शतक होणार की नाही?’ अशी टीका सोशल मीडियासह सर्व स्तरांतून होत आहे.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या बॅरेलचा दर सध्या ७७ डॉलर आहे. एक डॉलर ७१ रुपये असा चलनाचा दर आहे. वाढत्या कच्च्या तेलाचे दर आणि विनिमय दर बदलामुळे दिवसेंदिवस पेट्रोल व डिझेलच्या दरांत वाढ होत आहे. त्यातच महाराष्ट्रातील विविध करांचा परिणामही यावर झाला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ३१ आॅगस्टपर्यंत पेट्रोलची मूळ किंमत ५८ रुपये ८९ पैसे, मूल्यवर्धित कराचे (व्हॅट) १४ रुपये ७२ पैसे (२५ टक्के), अधिभार नऊ रुपये, २३ पैसे परवाना शुल्क असे ८२ रुपये ८४ पैसे पेट्रोल व विक्रेता मार्जिन तीन रुपये १६ पैसे असा एकूण ८६ रुपये दर आहे. याचबरोबर डिझेलची मूळ किंमत ५८ रुपये दहा पैसे, १२ रुपये व्हॅट, एक रुपया अधिभार असा ७१ रुपये ४९ पैसे व विक्रेता मार्जिन दोन रुपये तीन पैसे असा एकूण ७३ रुपये ५२ पैसे डिझेलचा दर होता.दरम्यान, १ मार्च २०१८ ला पेट्रोलचा दर ७९ रुपये ५२ पैसे, डिझेल ६५ रुपये ४३ पैसे असा दर होता. तो आज पेट्रोलचा दर ८६ रुपये ८२ पैसे,डिझेल ७४ रुपये ७३ पैसे इतका झाला आहे.
तीन दिवसांतील इंधनाचे दर (कोल्हापूर जिल्हा)एक सप्टेंबर : पेट्रोल ८६ रुपये १७ पैसे (१७ पैसे वाढ), डिझेल ७३ रुपये ७५ पैसे (२३ पैसे वाढ )दोन सप्टेंबर : पेट्रोल ८६ रुपये ३४ पैसे ( १७ पैसे वाढ), डिझेल ७४ रुपये १२ पैसे (३७ पैसे वाढ).तीन सप्टेंबर : पेट्रोल ८६ रुपये ६६ पैसे, (३२ पैसे वाढ), डिझेल ७४ रुपये ५३ पैसे (४१ पैसे वाढ)
एक देश, एक कर पाहिजे. पेट्रोल व डिझेल यांचा समावेश वस्तू व सेवा कर (जी.एस.टी)मध्ये करावा. जेणेकरून, इंधनाचे दर कमी होतील व याचा फायदा सर्वसामान्यांना होईल.- गजकुमार माणगांवे, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा पेट्रोल-डिझेल असोसिएशन.