कोल्हापूर : रंकाळा तलाव सुशोभीकरणाचा १५ कोटींचा आराखडा तयार करण्यात यावा, त्यास प्रादेशिक पर्यटन विकास कार्यक्रमातून मान्यता दिली जाईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराराणी सभागृहात मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पर्यटन समितीची बैठक झाली.
यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमन मित्तल, जिल्हा नियोजन अधिकारी सरीता यादव, समाज कल्याणचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, कार्यकारी अभियंता एन. एम. वेदपाठक, उपवनसंरक्षक हणमंतराव धुमाळ, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव विजय पवार, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, आदी उपस्थित होते.मंत्री पाटील म्हणाले, रंकाळा तलावाच्या सुशोभीकरणासाठी लागेल तेवढा निधी दिला जाईल; त्यासाठी एकात्मिक आराखडा तयार करून तो प्रादेशिक पर्यटन कार्यक्रमातून प्राधान्याने मंजूर करून घेतला जाईल. प्रादेशिक पर्यटन कार्यक्रमामधून रंकाळ्याबरोबरच नंदवाळ, हुतात्मा पार्कमधील हुतात्मा स्मारक व गार्डन विकसित करण्यासाठी दीड कोटीचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला असून, त्यास प्रादेशिक पर्यटन विभागाकडून मान्यता देण्यात येईल.राजर्षी शाहू जन्मस्थळाच्या संग्रहालयासाठी १३ कोटी रुपये मंजूर असून, त्यांपैकी २ कोटींचा निधी मिळाला आहे. हे काम सर्वांच्या सहमतीने व समन्वयाने होणे गरजेचे असून त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांची बैठक घेऊन शासन निर्णयानुसार कामे होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना त्यांनी केली.
शाहू महाराज समाधीस्थळाचे कामही गतीने व्हावे यासाठी महापालिकेने ४ कोटींचा प्रस्ताव तयार केला असून, त्यास नावीन्यपूर्ण योजनेतून मान्यता घेतली जाईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी शाहू महाराज यांच्या माणगाव येथील स्मारक उभारणीच्या कामासही प्राधान्य द्यावे.
जिल्ह्यातील वनपर्यटन वाढीस लागावे यासाठी वनविभागाने त्यांच्या अखत्यारीतील वनपर्यटन क्षेत्रासह अन्य नवनवीन वनपर्यटन क्षेत्रे विकसित करावीत व इको टुरीझमवर भर द्यावा. त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना व पाठपुरावा करावा, अशा सूचना त्यांनी केल्या. जिल्हा नियोजन अधिकारी सरीता यादव यांनी जिल्ह्यातील पर्यटन विकासकामाबाबत माहिती दिली.
अंबाबाई मंदिर दर्शन मंडपाचे आदेशमंत्री पाटील म्हणाले, श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्यास मान्यता मिळाली असून, दर्शनी मंडपाच्या कामाचे आदेश झाले आहेत. उर्वरित कार्यवाही प्राधान्याने करण्यात यावे. श्री क्षेत्र जोतिबा परिसर विकासासाठी २५ कोटींचा आराखडा अर्थसंकल्पित झाला असून, त्यातील ५ कोटींचा निधी मिळाला आहे. यातून दर्शन मंडप बांधण्यात येणार असून टेंडर प्रक्रिया सुरू झाली आहे.