कोल्हापूर, दि. ५ : कोल्हापूरात दुपारी एक वाजेपर्यंत एकूण १५0 गणेश मूर्तींचे पंचगंगेत विसर्जन झाले. पर्यावरणवादी कार्यकर्त्यांच्या आणि संस्थांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मोठ्या पाच मंडळांनी उस्फुर्तपणे मूर्ती दान केल्या. मिरवणूक मार्गावर किरकोळ वादवादीचे प्रसंग घडले, मात्र पोलिसांनी वेळेतच हस्तक्षेप केल्यामुळे मिरवणुकीला अद्यापतरी कोणतेही गालबोट लागलेले नाही.दुपारी १२ वाजेपर्यंत पाच गणेश मंडळे, तर ६५ तर दुपारी १ वाजेपर्यंत १00 गणेशमूर्तींचे विसर्जन झाले होते. इतर गणेश मंडळांनी पंचगंगा नदीवर गणेशाचे विसर्जन केले. पंचगंगा नदीवर सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी पहिल्या गणेशमूर्तीचे विसर्जन झाले. सुधाकर जोशी नगरातील एकी तरुण मंडळाने हा मान मिळविला. कसबा बावडा येथील राजाराम बंधारा येथील नदीपात्रात कोल्हापुरचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी आपली गणेशमूर्तीचे दान केले.
कार्यकर्त्यात किरकोळ वादावादी
दरम्यान, गणपती पुढे नेण्यावरुन पापाची तिकटी येथे पूलगल्ली तालीम आणि सुबराव गवळी तालीमच्या कार्यकर्त्यात किरकोळ वादावादी झाली, पण पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केल्याने उत्साहाला अद्याप तरी गालबोट लागलेले नाही.
पारंपारीक झांज, ढोल, लेझिमसोबत पिपाणी
यावेळच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत कोल्हापूरातील बहुतेक गणेश मंडळांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत डॉल्बीला तिलांजली दिली. त्यामुळे यंदाची मिरवणुक ही खास ठरली आहे. या विसर्जन मिरवणुकीत झांज, ढोल आणि लेझिम या पारंपारीक वाद्यांबरोबरच पिपाण्याही वाजविण्यात येत आहेत. लहान मुलासह मोठ्यांनीही पिपाण्या वाजवून मिरवणुकीचा आनंद घेत आहेत.हद्दपार रविकिरण इंगवले मिरवणुकीत सहभागी
हद्दपार करण्यात आलेले रविकिरण इंगवले मिरवणुकीत सहभागी झाले. हद्दपारीची नोटीस मिळाली नसल्याचा त्यांनी दावा केला असून कार्यकर्ते पाठीशी आहेत तोपर्यंत घाबरणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
मिरवणूक मार्गावर मंडळांसाठी स्वागत कक्ष
विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळांचे स्वागत करून त्यांना मानाचे फेटे आणि श्रीफळ देण्यासाठी विविध पक्ष, संघटनांनी दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी स्वागत कक्ष उभारले आहेत. कोल्हापूर महानगर पालिका, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी, भारतीय जनता पक्ष, जिल्हा आणि शहर शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राजर्षि शाहू छत्रपति परिवार, हिंदू एकता आंदोलन, सराफ असोशिएन, वेताळ तालीम मंडळ यांचा समावेश आहे. स्वागत कक्षासमोर आलेल्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांचे कोल्हापुरी फेटा बांधून तसेच मानाचा श्रीफळ देऊन स्वागत करण्यात येत आहे.
राजाराम तलाव येथे युवकास जीवदान
दरम्यान, राजाराम तलाव येथे मुडशिंगी येथील एका गणेश मंडळाची मूर्ति विसर्जित करण्यासाठी गेलेला सम्राट नगरकर ( वय २५, रा. मुडशिंगी) या युवकास पाण्यात बुडत असताना जीवदान देण्यात आले. नगरकर पाण्यात गटांगळ्या खात असताना फायरमन गणेश लकडे यांनी तात्काळ त्याला बाहेर काढले. यासाठी लकडे यांना नितीन श्रिंगारे, दौलत राणे यांनी मदत केली.